मुंबईतील वाघशिळा - वाघोबा देव

Vaghoba temple
वाघोबा मंदिर 

आ धुनिक मुंबई शहरामध्ये अनेक प्राचीन ऐतिहासिक स्थळांचा आणि पुरातन ठेव्यांचा खजिना आहे. अंधेरीतील महाकाली गुंफा, जोगेश्वरीतील जोगेश्वरी गुंफा, आणि बोरिवलीमधील कान्हेरी, मागाठाणे, व मंडपेश्वर लेणी या ठिकाणांमध्ये ऐतिहासिक वारसाचे दर्शन घडते. 

तसेच बोरिवलीमधील एक्सर मध्येही काही वीरगळी सापडलेल्या आहेत. त्या वीरगळांचा संदर्भ १२६५ मध्ये यादव राजा महादेव आणि शिलाहार राजा सोमेश्वर यांच्यात झालेल्या लढाईशी मिळतो, ती लढाई मुंबईच्या इतिहासामधील एक महत्त्वपूर्ण घटना आहे. बोरिवली पूर्वेतील देवीपाडा येथे एक विरगळ गावदेवीच्या स्वरूपात मंदिरात पूजली जाते.  

मुंबईमध्ये अजूनही अनेक अशा प्राचीन ठेव्यांचे अस्तित्व असू शकते, जे अजून प्रकाशझोतात आलेले नाहीत. त्यापैकी एक उल्लेखनीय ठिकाण म्हणजे गोरेगाव चित्रनगरीजवळील हाबले पाड्यातील वाघोबा मंदिर. 

या मंदिरात एक प्राचीन वाघशिळा आहे. हा ठेवा आदिवासी संस्कृतीशी संबंधित असून, वाघशिळा म्हणजे वाघोबा देवता, जी आदिवासी निसर्ग पूजकांची देवता आहे. वाघोबा मंदिरातील ही वाघशिळा अकराव्याव्या-बाराव्याव्या शतकातील असल्याचा अंदाज आहे, ज्यातून मुंबईच्या प्राचीन संस्कृतीचा वारसा समजून घेण्याची संधी मिळते.

प्राचीन मानवाने निसर्गाच्या शक्तींना देव मानण्याची परंपरा "आनिमिजम" (प्रकृतीपूजा) या संकल्पनेतून सुरू झाली. यात निसर्गातील प्रत्येक घटकाला, जसे की वारा, पाऊस, सूर्य, आणि भूमी, आत्मा असतो आणि त्यामुळे ते पूजनीय आहेत असे मानले जात असे. निसर्गातील या शक्तींचे मानवी जीवनावर असलेले प्रभाव आणि त्यांचे रहस्यमय स्वरूप, यामुळे मानव त्यांच्यात दैवत्व शोधू लागला.

वृक्ष, पशु आणि प्राणी यांमध्येही मानवाने शक्ती, उपयोगिता किंवा भीतीमुळे दैवत्व शोधले. हे आदिम निसर्ग पूजक मानव त्यांना देवाच्या स्वरूपात मानू लागले आणि त्यांच्या पूजेसाठी धार्मिक विधी सुरू झाले. भारतातील कृषिप्रधान समाजात आणि निसर्गाशी असलेल्या त्यांच्या अविचल नात्यामुळे, निसर्ग पूजा अजूनही भारतीय उपखंडात अनेक ठिकाणी अस्तित्वात आहे. वाघ देवता हे त्याचेच एक उदाहरण आहे.

वाघ हा आदिवासी समाजासाठी शक्ती, संरक्षण आणि भयाचे प्रतीक होता, त्यामुळे वाघाला देवतेच्या रूपात मानले गेले. वाघोबा देवताही आदिवासी निसर्ग पूजेचा एक अविभाज्य घटक आहे, ज्यात वाघ हा त्यांच्या पशुधनाचे रक्षण करणारा देवता म्हणून पूजला जातो.

भारतीय उपखंडात उत्तरेतील हिमालयापासून दक्षिणेतल्या मलयपर्वताचा जंगलांमध्ये राहणारे स्थानिक समुदाय वाघाला देव मानतात. वाघांबद्दलचा त्यांचा आदर हा दोन प्रजातींमधील जन्मजात सह-अवलंबनातून येतो. आदिवासी लोक त्यांच्या उपजीविकेसाठी जंगलांवर अवलंबून असतात. या समुदायांसाठी नैसर्गिक अधिवास हे जीवन आहे. जे स्वतःला जंगलापासून वेगळे पाहू शकत नाहीत. वाघ आहे तर जंगल आहे. जंगल असेल तर त्यांच जनजीवन सुरळीत चालणार हे ते जाणून आहेत.

हबाले पाड्यातील वाघोबा देवतेचे मंदिर, ज्याचा इतिहास आणि श्रद्धा आदिवासी संस्कृतीशी निगडित आहे. हे मंदीर पूर्वी साधे आणि छोटे होते, परंतु आता एका प्रसिद्ध हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्याने या मंदिराचा जिर्णोद्धार केला आणि सभोवती कंपाउंड बांधले. 

vaghshila - vaghoba temple
वाघोबा मंदिरातील वाघशिळा

या मंदिरातील वाघशिळा आदिवासी संस्कृतीतील वाघोबा देवतेचे प्रतीक आहे, ज्याची पूजा पशुधन आणि संरक्षणासाठी केली जाते. वाघशीळा सहसा उघड्यावर असते आणि  उभ्या लाकडावर किंवा दगडावर कोरली जाते. हबाले पाड्यातील वाघशीळा दगडावर कोरली गेली आहे, तिच्या स्थापत्य शैलीवरून ती अकराव्या-बाराव्या शतकातली असावी असे मानले जाते. 
शिळेवर वाघाची आकृती कोरली जाते.वाघाच्या आकृतीच्या वर चंद्र आणि सूर्य कोरलेले असतात, जे दर्शवितात की जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत, तोपर्यंत वाघोबा देवता त्यांचे रक्षण करतील. या वाघशीळेवर पुजारी वाघ देवतेची पूजा करताना दाखवला आहे. हे या वाघशिळेचे वैशिष्ट्य आहे .

मंदिराच्या परिसरात आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण देवतेची मूर्ती आहे, जी एका झाडाखाली ठेवली आहे. मूर्ती चतुर्भुज, तसेच घोड्यावर बसलेली असून हातात विविध शस्त्रे धारण केलेली आहेत. ती मुर्ती येथील प्राचीन धार्मिक परंपरेचे प्रतिनिधित्व करते.

देवतेची मूर्ती
देवतेची मूर्ती

 हबाले पाड्यातील काही भाग मुलुंड लिंक रोडमध्ये जाणार असल्यामुळे या मंदिराचे भवितव्य अनिश्चित आहे. या परिस्थितीत वाघशिळा आणि मंदिराचे स्थान हलवले जाऊ शकते. वाघशिळेला हलवणे हे संवेदनशील काम असेल, कारण ती या क्षेत्रातील आदिवासींच्याच नाही तर आपल्या मुंबईच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारस्याचे प्रतीक आहे. 

Post a Comment

0 Comments