मुंबईची दुर्लक्षित आदिवासी आणि त्यांची वारली चित्र परंपरा
गोरेगाव हे मुंबईच्या पश्चिम उपनगरातील महत्त्वाचं स्थान आहे. येथे इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट, नेस्को एक्झिबिशन सेंटर, महानंद दूध डेअरी, आरे मिल्क कॉलनी आणि फिल्मसिटी सारखी महत्त्वाची ठिकाणं आहेत. गोरेगाव मुंबई उपनगराचा भाग होण्यापूर्वी येथे ही गावांचे समूह होते. गोरेगावच्या पूर्व भागातील दिंडोशी, पहाडी आणि आरेगाव ही गावं अत्यंत प्राचीन असून, त्यांचा उल्लेख १४व्या शतकातील महिकावतीच्या बखरीत देखील आढळतो.
१४ व्या शतकातील महिकावतीच्या बखरीत मालाड माहालातील दिंडोशी, पहाडी आणि आरे गावांचा उल्लेख आणि सरकारात जमा केल जाणारे उत्पन्न आणि जमा करणाऱ्यांची नाव पुढील प्रमाणे सापडतात
या उपर माहाल मालाडचा उपज त्याचि वगत ।। छ ।। माहाल मालाड व जमीदार श्रीपतराव गोत्र हरीत ।। मालाड भात मुडे ४५५ राजभाग ३५७ धर्म ८ सीळोतर ९ ॥ १ ।। गावं पाहाड वजदार कृष्णराव गोत्र कश्यप सरकारभात मुडे २५४ राजभाग १८० सीळोतर ७४ नगद दाम ३००० ॥ २ ॥ गावं आरें वजदार देवप्रभु गोत्र कौंडण्य सरकारभात मुडे १२७ राजभाग ११४ धर्म १३ सीळोतर ३ नगद दाम १३० ॥ ३ ।। गावं वेडे वजदार नारायेण केशव प्रभु गोत्र कश्यप भात मुडे ४६१२ राजभाग ४५ सीळोतर १४१२ नगददाम ४५ ॥ ४ ॥ गावं दिंडोसि ५ वजदार शामराव प्रभु गोत्र पौतमाक्ष भात मुडे ६६५९ राजभाग ५३ सीळोतर १३ नगद दाम १५० ॥ ५ ॥
मुंबईच्या विस्तारीकरणांमध्ये पहाडी आणि दिंडोशी गावांचं संपूर्ण शहरीकरण झालं असलं तरी आरे गावात काही प्रमाणात गावपणाच्या खुणा शिल्लक आहेत, विशेषतः दूध वसाहतीच्या आणि चित्रं नगरीच्या राखीव जंगलामुळे.
मुंबईच्या आरे वसाहतीच्या जंगलाला लागून फिल्म सिटी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच जंगल आहे, जे पुढे ठाण्याच्या घोडबंदर भागापर्यंत पसरलेल आहे. येथील जंगलाच्या मध्ये निसर्गाशी निगडित परंपरा जपत आदिवासी समाज आजही राहत आहे. मुंबईतील प्राचीन रहिवासी म्हणून आगरी, कोळी, भंडारी आणि सीकेपी समाजांची ओळख असली तरी, मुंबईच्या आदिवासी समाजाचा उल्लेख बऱ्याचदा दुर्लक्षित राहतो.
राधा मावशीचं घर |
मुबईतील सीकेपी आगरी कोळी लोकांच्या वस्त्याना वाड्या असे म्हणत तर आदिवासींच्या वस्त्या म्हणजे पाडे. मुंबईमध्ये असलेले असंख्य पाडे एकेकाळी आदिवासींच्या वस्त्या होत्या.मुंबईच्या शहरीकरणाच्या प्रक्रियेत आदिवासींच्या वस्त्या लुप्त झाल्या, आणि त्यांची अस्तित्वाची खुणा केवळ पाडे या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वस्त्यांमध्ये उरल्या आहेत. हे मूळ रहिवासी आपल्या जमिनीवरच परक्याप्रमा जीणे जगत आहेत. पंचवीस वर्षांपासून येऊर ते गोरेगाव या परिसरातील आदिवासींच्या जमिनी राजकारणी आणि परप्रांतीयानी हडपल्या असल्याच्या कथा ऐकत आलो आहे. यामागे अशिक्षितपणा, दारिद्र्य आणि दारूचे व्यसन हे मुख्य कारणं आहेत, ज्यामुळे या जमिनींवर इतर लोकांनी कब्जा केला आहे.
भात शेती |
गोरेगावच्या फिल्मसिटीला लागून असलेला हबाले नावाचा वारली आदिवासींचा पाडा आपल्या पारंपरिक संस्कृतीला जपून आजही अस्तित्वात आहे. फिल्मसिटीमध्ये विविध चित्रपटांच्या दृश्यांसाठी सतत बदलत असलेले सेट आणि सांस्कृतीक वैविध्य पाहायला मिळते. मात्र, या चकाकत्या चंदेरी दुनियेतही वारली आदिवासी पाडे निसर्गाशी सुसंगत पारंपारिक जीवनशैली जपत आहेत.
तुटलेले धरण |
हबाले पाड्याला भेट देणं ही आमच्यासाठी एक आगळीवेगळी अनुभूती असते, विशेषतः पावसाळ्यात. या पाड्याचं मुख्य आकर्षण म्हणजे ओढ्यावरचा तुटलेल छोटे खाणी धरण, लोखंडी पूल,भात शेती आणि वाघोबा देवाचं मंदिर. वाघोबादेव हा वाघाच्या रूपात पूजला जाणारा देव आहे, भारतातील अनेक स्थानिक आदिवासी जमातींमध्ये वाघाचं महत्त्व मोठं आहे. त्यांचं वाघाशी एक सह-अस्तित्वाचं नातं असतं, कारण वाघ आहे तर जंगल टिकणार, आणि जंगल टिकणार तर त्यांचं जीवन सुरक्षित राहणार, अशी या आदिवासींची श्रद्धा आहे. हबाले पाड्यातील आदिवासी लोकांचं, येथील वाघोबा देवाचं मंदिर श्रद्धास्थान आहे. वीस बावीस वर्षापूर्वी हे मंदिर साध छोटे होतं. आता टाइल्स लावून आजूबाजूला कंपाऊंड बांधले आहे. मंदिरात वाघ शिळा आहे. वाघशिळा शक्यतो उघड्या आवारात उभ्या लाकडावर किंवा दगडावर कोरलेल्या असतात. येथे वाघ शिळेवर मंदिर बांधल आहे. शिळेवर खाली वाघ कोरून वरच्या बाजूला चंद्र सूर्य कोरलेले असतात. ज्याचा अर्थ "चंद्र-सूर्य अस्तित्वात असेपर्यंत वाघोबा देवता आमची रक्षा करेल" असा आहे.
वाघ शिळा |
नेहमी प्रमाणे ह्याही वर्षी पावसात हबाले पाड्याला भेट द्यायला गेलो असता पाड्यातील घरा जवळून राधा मावशींनी चौकशी सुरू केली कोठून आलात? का आलात? आमच्या सोबत पहिल्यांदाच असं होत होत. ह्या चौकशीचे कारण ही तसेच होते. फिल्म सिटी मधून बनत असलेला सहापदरी मुलुंड गोरेगाव लिंक रोड. त्यांच्या शेत जमीनी समोर होणारे वारंवार सर्वे, चालू असलेले रस्त्याचे बांधकाम, फिरणारे कामगार ह्या सर्वांमुळे आपली ही जमीन प्रकल्पामध्ये जाईल की काय? ही मनातील सुप्त भीती. आम्ही बाजूच्याच वस्ती मधून आलो हे कळल्यावर राधा मावशी निर्धास्त झाल्या आणि आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारू लागल्या. आम्ही त्यांच्या घरातील पडवी मधील वारली चित्र मोबाइलद्वारे टिपत असताना, त्यांच आमच्या कडे लक्ष गेलं आणि घरा मध्ये गेल्या वर्षी मुलीच्या लग्नात काढलेल्या चित्रा बद्दल सांगू लागल्या आणि घरात नेऊन आत्मीयतेने चित्र दाखवू लागल्या.
त्यांच्या माहितीनुसार लग्नकार्यात वारली चित्र काढल्याशिवाय लग्न कार्य पूर्ण होत नाही. चित्रात एकंदर त्यांचा लग्नविधी साकारलेला होता. चित्रात नवरा नवरीचे नाव लिहिले होते. चित्रात त्यांचा मुख्य देव वाघोबा आणि भेषा देव ही होता. त्याच बरोरीने मंदिर सूर्य, चंद्र,मासा, कासव, फणी, शिडी, लग्नाची वरात करवल्या इत्यादिची चित्रे काढली होती. ह्या चित्रासमोर देव खेळवला जातो (वार येणे किंव्हा अंगात येणे) देवखेळवत चित्रातली प्रतिकांना शेंदूर लावला जातो त्यानंतरच लग्न होत.
लग्नं चौक |
लग्नविधीत काढलेले वारली चित्राला लग्नं चौक म्हणतात हा एक विधी असतो. या एकाच चौकात लग्न चौक, आणी देव चौक असतो. लग्नघरी एक-दोन दिवस आधी चवुक लिहिला जातो. इथे चवुक काढणे नाही तर लिहिणे शब्दप्रयोग केला जातो. सवाष्ण स्त्री देवाच्या नावाने घराच्या भिंतीवर पहिली देवरेघ ओढते. नंतर नवरा-नवरीच्या नावाने रेघ ओढली जाते. वारली समाजातील महिला शेतीचे हंगाम, सण उत्सव अशा प्रसंगी भिंतीवर वारली चित्रे काढतात. गेरूने सारवलेल्या भिंतींवर तांदळाच्या पीठात मोहाच्या झाडाचा चीक टाकून बाहरी म्हणजे बांबूच्या काडीने अथवा खजरीच्या काडीने चित्रे काढतात. त्रिकोण,गोल आणि आयत या भौमितिक आकृृतींचा प्रामुख्याने वापर वारली चित्रकलेत केलेला पहायला मिळतो. तारपा हे पारंपरिक वाद्य वाजविणारा पुरूष मध्यभागी उभा असून त्याच्याभोवती गोलाकार रचनेत नृत्य करणारे स्री पुरूष अशी चित्रे वारली पद्धतीत विशेष करून आढळतात. निसर्गाशी एकरूप होऊन जगणाऱ्या या जमातीच्या चित्रांमध्ये त्यांची लोककथा, परंपरा, आणि सणांचं प्रतीकात्मक चित्रण पाहायला मिळतं.
तराफा नृत्याचे वारली चित्र |
वारली जमातीने आपल्या निसर्गातील आजुबाजुला वावरणाऱ्या प्राणी पक्षी ह्यांना चित्रात प्रामुख्याने स्थान दिले आहे.
मोर यांचा पवित्र आणि शुभ पक्षी चित्रात असतो त्याच बरोबर बैल, विंचू ,मासा, कासव आणि इतर वन्य पक्षी, प्राणी, झाडे, डोंगर, भात शेती, शिकार, त्यांचे देव देवता आणि मंदीर चित्रात काढले जातात. सर्वात वरच स्थान असते ते त्यांच्या वाघोबा देवाच.
पाड्यातली विहीर |
या आदिवासी पाड्यांच अस्तित्व हे त्यांच्या पारंपारिक ज्ञानावर आणि निसर्गाशी असलेल्या सहजीवनावर आधारित आहे. मात्र, शहरीकरणाच्या वाढत्या प्रक्रियेमुळे त्यांचं जगणं बदलतंय, आणि त्यांच्यावरही आधुनिक जगाचा दबाव येतोय. हक्क मिवण्यासाठी साठी व्होट बँकेची ताकद आणि दुःखाला टीआरपीची झालर नसेल तर सध्याच्या दुनियेत तुमच्या समस्या आणि दुःखाची कोणी दखल घेईल ही शक्यता कमीच. मुंबईत तुरळक पसरलेला नेतृत्वहीन आदिवासी समाजाकडे ना मतांचा आधार ना मीडियाचं लक्ष त्यामुळे समाजाच्या समस्या अनेकदा दुर्लक्षित राहिल्या. स्वतःच्याच पिढीजात जागेत त्यांचे पाडे नामशेष झाले आणि आदिवासी समाज आपल अस्तित्व गमावून बसला. फिल्म सिटीच्या राखिव जंगलात तग धरून राहिलेला हबाले पाडा आणखी किती वर्ष तग धरतो हे काळच ठरवेल!