देवदार गुहा आणि मंदाकिनी डोंगर | Devdar Caves and Mandakini Hill | भ्रमर
श्री क्षेत्र वज्रेश्वरी समोर साडेतीन-चार किलोमीटर अंतरावर तानसा आणि वैतरणा नद्यांच्या मध्ये उत्तर-दक्षिण पसरलेली मंदाकिनी नावाची एक छोटी डोंगररांग दृष्टीस पडते.
अंदाजे १५०० फुटा पेक्षा जास्त उंच असलेल्या मंदाकिनी डोंगरावर देवदार नावाच्या छोट्याशा नैसर्गिक गुंफेमध्ये एक मंदिर बांधले असून दोन प्राचीन कातळात खोदलेली पाण्याची टाक आहेत.
वज्रेश्वरी-गणेशपुरीसारख्या गजबजलेल्या पर्यटन क्षेत्रापासून हाकेच्या अंतरावर असूनही मंदाकिनी डोंगर एखाद्या विरक्त योग्याप्रमाणे पर्यटकांच्या गजबटापासून अलिप्त आहे.
स्थानिक लोकांशिवाय येथे इतर कुणी पर्यटक फिरकत नसल्यामुळे मंदाकिनी डोंगराची माहिती सहसा आपणास उपलब्ध होत नाही.
मलाही या क्षेत्राची माहिती चार वर्षापूर्वी अनायासा मिळाली. गुगल मॅपमध्ये वज्रेश्वरी प्रदेश धुंडाळत असताना देवदार गुंफा नाव दिसले आणि माझी शोध मोहीम सुरु झाली. गुगलच्या मायाजालमध्ये येथील, माहिती सहसा सापडत नाही. देवदार गुंफा आणि पांडव हौदाचे काही फोटो मात्र मायाजाल वर दिसले . प्रत्यक्ष जायचा योग आता चार वर्षांनी आला.
संदेश, लतेश आणी मी असे आमचे त्रिकुट गोरेगाव मधून ऑगस्ट महिन्याच्या चौदा तारखेला मंदाकिनी डोंगराच्या भटकंतीसाठी वज्रेश्वरीच्या दिशेने निघालो.
आधीच नियोजित वेळेपेक्षा निघण्यास उशीर झाला होता आणि त्यात वसईतील खाडीवरील ब्रिजच्या ट्रॅफिकची भर पडली.
उसागाव नाक्यावर चहानास्ता साठी विश्रांती घेऊन आम्हीं पुढील प्रवासाला निघालो. मंदाकिनी डोंगरावर जाण्यासाठी वज्रेश्वरी मंदिराजवळील नाक्यावरून बाजारपेठेतून जाणारा डावीकडील रस्ता पकडावा लागतो. नाक्यावरून मंदाकिनी डोंगराचा पायथा अवघा चार किलोमीटरवर आहे. खराब रस्त्यामुळे हाच चार किलोमीटरचा रस्ता आतापर्यंतच्या आमच्या संपूर्ण प्रवासाचा अर्धा वेळ घेईल याची मात्र आम्हाला कल्पना न्हवती.
बाजारपेठेतील रस्त्याने काही अंतर पुढे गेल्यावर डावीकडे तानसा नदीवर पूल आहे. या पुलावरून केळठण गावात जाणारा रस्ता जातो. तानसा नदीपात्रा वरील पुल ओलांडताच रस्त्याची विदारक परिस्थिती नजरेसमोर आली. रस्त्याची अत्यंत दैनिय अवस्था दिसत होती. तरी त्याच रस्त्याने पुढे जायचे ठरवले.
पुलापासुन काही अंतर पार केल्यावर रस्त्याला दोन फाटे फुटतात. एक रस्ता केळठणला जातो तर दुसरा पलसाई गावात जातो. केळठणला जाणारा रस्ता पूर्णपणे उखडला होता. रस्त्याचे काम करणारे डंपर आणि ट्रक मात्र त्या रस्त्याने जात होते. आमची न्यानो गाडी ह्या रस्त्यावरून जाणे मात्र अशक्य होते.
गावातील स्थानिक मुले नाक्यावर उभी होती, त्यांच्याजवळ लोहापे धरण आणि देवदार गुहे बद्दल चौकशी केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार रस्ता खराब असल्यामुळे लोहापे धारणा जवळ तुम्हाला जाता येणार नाही. गाडी येथे उभी करून चार किलोमीटर चालत जावे लागेल. त्यापेक्षा तुम्ही पलसाई रोडने केळठणला पोहोचा. तेथून देवदार गुहेजवळ जाता येईल अशी माहिती त्यांनी दिली.
लोहापे धरणाच्या भिंतीवरून गुहा मंदिराकडे जाता येते एवढीच त्रोटक माहिती गूगलचा मायाजालवर मिळते. पांडवहौद, मंदाकिनी हील मॅपवर दाखवते, तिथे कसे जायचे, हे सर्व मंदाकिनी डोंररांवराच आहे, ह्याची योग्य माहिती गुगलवर उपलब्ध होत नाही. त्यामुळे थोडा वेळ तिथे थांबून विचार केला आणि गुगलबाबाला रामराम करून स्थानिक लोकांचा मार्गदर्शनाखालीच पुढचा प्रवास करायचा असे ठरवले.
विशेष सूचना-: गुगल मॅपवर "देवदार गुहेचे (Devdar Cave)" चुकीचे लोकेशन दाखवते.
गुगल मॅप वर "देवदार गुहा खरे ठिकाण (Actual Devdar Cave)", लिहिले आहे ते देवदार गुहेचे योग्य लोकेशन आहे.
केळठणच्या मूळ रस्त्याने न जाता स्थानिकांच्या मार्गदर्शनाखाली पलसाई मार्गे केळठण गाठण्याचे ठरवले.
गावातील पाडे पार करत केळठण मधील हनुमान मंदिरा शेजारील शाळेजवळ पोहचलो. स्थानिक लोकांकडून रस्त्याची खात्री करत नॅनोची सफारी चालू होती. एकूण काय रस्त्यांची अवस्था पाहता बिचाऱ्या छोट्या गाडीवर हा एक प्रकारे अन्याय सुरु होता.
पक्का रस्त्ता संपतो अशा एका पाड्यात गाडी थांबवली. पुढे कच्चा रस्ता असल्याने पुढचा प्रवास पायी करावा लागणार होता. पाड्यात रस्त्याची चौकशी करून आम्ही पुढे चालू लागलो. रस्त्याला पुढे दोन फाटे फुटतात. आम्ही उजव्या बाजूच्या रस्त्याने चालू लागलो.
उजव्या बाजूने काही अंतर चालल्यावर एक आजी येताना दिसली. आजीकडे देवदार गुहेच्या वाटेची चौकशी केली असता, आमची सुरवातच चुकीच्या वाटेने झाली हे आम्हाला कळून चुकले.
आजी मंदाकिनी डोंगराच्या वाटेच्या दिशेने जात असल्याने तीने तिच्या सोबत येण्यास सांगितले. वाटेत शेती आणि ओढ्याचे दर्शन होत होते. ओहळ ओलांडून काही अंतर चालल्यावर छोट्या नदी जवळ पोहचलो.
नदी पार केल्यावर विस्तीर्ण पठार आणि घरे दृष्टीस पडतात. आजीचे घर ही तिथेच होते.
आजीने पठारावरुन उजव्या बाजूने डोंगराच्या दिशेकडील वाटेकडे निर्देश करून सांगितले कि ही वाट सरळ पकडून जा. वाटेत एक नदी लागेल, नदीपार केल्यावर मंदाकिनी डोंगररांगच्या पायथ्याशी पोहचाल, समोर दिसतो तोच मंदाकिनी डोंगर आहे.
आजिचा निरोप घेउन आम्ही डोंगररांगेच्या दिशेने चालू लागलो.
काही अंतर चालताच एका भातशेती असलेल्या मांगरा (फार्म हाउस) जवळ पोहचलो.
डुकरांचा मोठ्या प्रमाणात आवाज येत होता. आवाजाचा दिशेने गेल्यावर बंदिस्त वराह पालनाची शेड दिसली. अंदाजे पन्नास एक डुकरे एका शेड मधे बंदिस्त होती. बंदिस्त कुकुट पालन, शेळी पालन एवढेच काय कोंडाने गावात बंदिस्त इमु पालन पाहण्याचा योग आला होता. प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात बंदिस्त वराह पालन पाहायला मिळत होते.
येथून डोंगराच्या दिशेने जाणारा मोठा कच्चा रस्ता दिसत नव्हता. खरं म्हणजे आम्ही चिखल टाळण्याच्या नादात वाट चुकलो होतो. (मंदाकिनी डोंगराच्या दिशेने जाणारी वाट या फार्म हाऊसच्या कुंपणाला खेटुन जाते).
आजूबाजूला आवाज देउन पाहिले परंतु काही उपयोग झाला नाही. सरतेशेवटी रानातून वाट काढत नदी पात्रात उतरलो.
नदीपलिकडे मला गावातील गुराखी भेटला त्याला मंदाकिनी डोंगरावर जाण्याचा रस्ता विचारताच तो स्वतः वाट दाखवण्यास आला. तो आपली गुरे घेऊन नदीपात्रामधून मंदाकिनी डोंगरावर जाणाऱ्या वाटे पर्यंत घेऊन आला.
आम्ही पहिल्यांदाच देवदार गुहामांदिरात जात आहोत हे कळताच त्याला आमची काळजी वाटली. नवीन माणसाला गुहामंदीर आणि पांडव हौद सापडणं कठीन आहे. मी तुमच्याबरोबर येतो, तूम्ही येथे थांबा मी माझी गुरे रानात सोडून येतो, म्हणत तो गुरे घेऊन रानाच्या दिशेनं गेला.
तो येई पर्यंत आम्ही नदी पात्रात टाइम पास करत बसलो. गुराखी येताच आम्ही त्याच्या सोबत मंदाकिनी डोंगराच्या दिशेने चालू लागलो. एक स्थानिक गावकरी बरोबर असल्यामुळे आता आम्ही निश्चिंत होतो. आता वाट चुकण्याची काही काळजी नव्हती.
आम्ही दहा - साडे दहा वाजता गुहे मध्ये असू या अंदाजाने निघालो होतो. देवदार गुहा मंदीर पाच-सातशे फूट उंचीवर असेल ह्या बेफिकरित घरून उशिरा निघणे, खराब रस्ता यामुळे मंदाकिनीच्या पायथ्याशी चढाईची सुरवात करायला बारा वाजले होते.
मंदाकिनी डोंगराची वाट पायथ्या पासून तीव्र चढणीची असून सुरवातीचे काही अंतर दाट जंगलातून जाते. जंगल संपताच चढ अधिक तीव्र होऊन पाय वाट निसरडी होत जाते.
पण पावसामुळे वाट अधिकच निसरडी झाली होती. डोंगर चढताना डोळ्याचे पारणे फिटावे असे निसर्गाचे दर्शन घडत होते.
चढण चढून वर गेल्यावर एका छोट्या पठारावर पोहचल्यावर डोंगराच्या दक्षिण दिशेला आडवे चालत राहावे . पठारावरून लोहापे धरणाचे सुरेख दर्शन होते.
डोंगराला वळासा मारून लोहापे धरणाच्या दिशेने उतरणाऱ्या घळीच्या दिशेने आम्ही आडवे चालत राहिलो.
घळी जवळ येताच आपल्याला गुहा मंदिराचे दर्शन होते. घळीत उतराणारी कातळ खडकातुन जाणारी वाट शेवाळामुळे अवघड झाली होती पावसात येथे जरा जपून उतरावे लागते. मंदिराच्या प्रांगणात उतरण्यासाठी सिमेंटच्या पायऱ्या बनवल्या आहेत. पायऱ्या उतरून आपण थेट मंदिराच्या समोर पोहोचतो.
लोहापे धरणाच्या भिंतीवरुन ही गुहामंदिरात येता येते पण धरणाच्या भिंतीवरुन येणारी वाट पावसाळ्यात चढणे अवड होते त्यापेक्षा केळठण मधून येणारी वाट अधिक सुरक्षित आहे असे आमच्या वाट्याड्याचे म्हणणे होते.
चिंचोळ्या गुहेच मुख बंद करून, लोखंडी दरवाजा बसवला आहे गुहेच्या वरती कळसाची बांधणी केली असून, गुहेच्या समोर यज्ञवेदी बनवली आहे.
प्रथमदर्शनी गुंफेमधील आणि बाहेरील बांधकाम पहाता हे सर्व वीस-पंचवीस वर्षाचा आत झालेले दिसते.
गुंफेच्या आत शिरताच उजव्या बाजूला एक सिमेंटचा चौथरा असून दोन छोट्या शिवपिंडी, एक महादेवाची मूर्ती आहे आणि सोबत गणेशपुरीच्या नित्यानंद महाराजांनची मूर्तीही आहे.
गुंफेची सर्वात जास्त उंची साडे सहा फुट असावी आणि रूंदी हि सहा फुटा पेक्षा जास्त नसावी. गुहेची लांबी अंदाजे विस-पंचवीस फुट असेल, गुहा पुढे निमुळती होत जाते.
सर्व साधारण गुहेचा आतील आकार कापडी वायु मापका (wind gauge) सारखा आहे. सहा सात फुटापुढे गुहा पाण्याने भरलेली होती. हे पाणी आमाचा गाईडच्यामते दिवाळी नंतरही एक दोन महिने असते.
एक बुवा या गुहेमध्ये आपलं बस्तान बांधुन राहात होता. गावातील येणाऱ्या लोकांनाही पाणी पिण्याला गुहेत येऊ देत नसे. गुहेवर हक्क प्रस्थापित करणाऱ्या ह्या बुवाला गावकऱ्यांनी येथून पळवून लावले.
नित्यनंद महाराज येथे येत असत असे ही सांगितले जाते त्यात सत्यता किती हे सांगता येत नाही. एक साध्वी मात्र श्रावण महिन्यात ह्या गुहे मध्ये राहिला येते. ह्या वर्षी मात्र आली नव्हती.
श्रावण सोमवार आणि शिवरात्रीशिवाय ह्या गुहेजवळ भाविक क्वचित दर्शनासाठी येतात.
गुहा पाहून झाल्यावर आम्ही पांडव हौदाकडे जाण्यचे ठरवले. गुहे जवळील छोटी घळ पारकरून मंदाकिनी डोंगराच्या माथ्याचा दिशेने चढाई करून हौदा जवळ जाता येते.
आम्हाला गाईडने तिथून न नेता दुसऱ्या वाटेने घेउन गेला. आम्ही आलो त्या पठारावरील वाटेवरून एक वाट डोंगर माथ्याच्या दिशेने जाते, त्या वाटेने आम्ही पांडव हौदाच्या दिशेने गेलो.
या वाटेने माथ्याच्या दिशेने काही अंतर चालत गेल्यावर झाडीमधून एका छोट्या पठारावर आपण पोहचतो. पठारावर येताच समोर हिरव्यागार गवताने अच्छादित टेकडी दृष्टीस पडते. हिमालयातील एखाद्या गवताळ कुरणाच लघुरूप पाहातो अस वाटू लागत. गम्मत अशी की स्थानिक मुल त्या टेकडीवर जुगाडु माऊंटन स्केटिंगचा आनंद घेतात. हिरव्यागार टेकडी वरुन दोन समांतर बैल गाडी चाल्या सारख्या लाल मातीचे पट्टे खाली उतरताना दिसतात. त्या खुणा मुल ओंडक्यावर स्वार होउन स्केटिंगचा आनंद घेतात त्याच्या आहेत.
टेकडी खालील पठारातुन उजव्या बाजुने झाडीत जाणाऱ्यावाटेने गेल्यावर आपणास पांडव हौदाच दर्शन होते.
पांडव हौद हे सह्याद्रीत इतरत्र कातळात खोदलेल्या पाण्याचा टाक्यासारखेच पाण्याचे छोट्या आकराच चौकोनी टाक आहे. स्थानीक गाईडचा माहिती नुसार असेच एक पाण्याचे टाक डोंगराच्या उत्तर दिशेस आहे.
ह्या डोंगराव पाण्याचे दोन टाके खोदण्याचे प्रयोजन काय असावे हे मात्र लक्षात येत नाही. बहुतेक पाण्याची टाके गुंफा-व्यापारी मार्ग किंवा किल्ल्यांवर खोदली जातात. इथे कुठलीही मानव निर्मित गुंफा नाही.
नैसर्गिक छोटी गुंफा आहे तिही अर्ध्यापेक्षा जास्त पाण्याने भरलेली असते. पावसाळ्यात अगदीच अवघडून राहिले तरी चार पाच व्यक्ती पेक्षा जस्त व्यक्ती गुहेत दिवसभर आराम करू शकत नाहीत.
गुंफेपासून टाके बऱ्यापैकी लांब आणि उंचीवर आहे. वाटसरुन साठी एवढ्या उंच डोंगरावर पाण्याचे टाके कोण कशासाठी बांधेल हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो. खास पाणी पिण्यासाठी हजार फूट डोंगर चढुन कोण जाईल?
मंदाकिनी डोंगराच भौगोलिक स्थान, उंची आणि डोंगरचढाईस अवघड असणे ह्या सर्व गोष्टी येथे कधीकाळी टेहळणी दुर्ग बांधण्याचा विचार झाला असावा का? असा प्रश्न मात्र नक्कीच पडतो.
मंदाकिनी डोंगर मुंबईची तहान भागवणाऱ्या, उत्तर कोकणाला समृद्ध करणाऱ्या तानसा आणि वैतरणा नद्यांच्या मध्ये आहे.
उत्तर बाजूस वैतरणा नदीची खोरे तर दक्षिण बाजूस तानसा नदीचे खोरे पसरले आहे. पूर्व दिशेस माहुली पर्यंत त्याच्या उंचीचा डोंगर दिसत नाही. दोन्ही खोऱ्यामधून पूर्वी देशावरून कोकणात उतरणारे व्यापारी मार्ग होते. उत्तर,पूर्व, दक्षिण ह्या तीन्ही दिशाना नजर ठेवण्यास ही उत्तम जागा आहे.
खोदलेली दोन छोटी पाण्याची टाक कदाचित गड बांधणीच्या विचाराने केली असावीत का? असाही प्रश्न पडतो. काही कारणास्तव मंदाकिनी डोंगरावर किल्ला बांधण्याचा विचार मागे पडला असावा किंवा गुमतारा आणि टकमक सारखे गड शेजारीच असल्याने नवीन गड बांधण्याची गरज पडली नसावी.
आपल्या देशात अनाकलनीय जुन्या आज्ञात वास्तू पौराणिक कथेशी जोडल्या जातात. त्यातल्या त्यात वास्तूच्या बांधकामाचे श्रेय पांडवांच्या अज्ञातवासाच्या कथेशी जोडण्याचा कल जास्त असतो.
येथे ही स्थानिक लोक हे पाण्याच टाक.पांडवांनी बांधले असे सांगतात. स्थानिकांमध्ये हे पाण्याचे टाके पांडव हौद म्हणूनच प्रसिद्ध आहे.
आम्हाला दुसरेही टाके पहाण्याची ईच्छा होती. आमचा गाइड निस्वार्थीपणे आपली गुरे रानात बांधून आमच्यासोबत आला होता. तीन वाजले होते त्याला खाली उतरून गुरांकडे जाणे गरजेचे होते. त्यामूळे आम्ही मंदाकिनी डोंगराची भ्रमंती आटपून खाली उतरण्याचा निर्णय घेतला.
पावसामुळे मंदाकिनी डोंगर चढण्यापेक्षा उतरणे कठीण जात होतं. डोंगराचा तीव्र उतार आणि घसरडी वाट असल्याने पावसाळ्यातील भटकंतीसाठी योग्य आशी पादत्राणे घालूनच येथे येणे योग्य.
मंदाकिनी डोंगराच्या दक्षिण टोकावरून तानसानदीच्या खोऱ्याचे दर्शन होते. नागमोडी वळण घेत वाहणारी तानसा नदी आणि तिच्याकाठावर वसलेल्या टुमदार गावांच्या सौंदर्याचे दर्शन घडते.
तानसानदीच्या काठावर गरम पाण्याच्या कुंडांसाठी प्रसिद्ध असलेली, वज्रेश्वरी अकोली, गणेश पुरी ह्या तीर्थक्षेत्रांचे आपण एरियल व्हिवने दर्शन घेऊ शकतो.
दक्षिणेस गुमतारा किल्ला आणि तुंगारेश्वरची डोंगररांग आपल्या दृष्टीस पडते. पश्चिम बाजूस टकमक आणि कहोज किल्ल्यांचे दर्शन होते.
पूर्व बाजूस मुंबईची तहान भागवणारे तानसा जलाशय तसेच आकाश स्वच्छ असल्यास माहुली गडाचे दर्शन होऊ शकते. डोंगराच्या उत्तर बाजूस वैतरणा नदीचे खोरे आहे.
मंदाकिनी डोंगरावर यायचे असल्यास विरारस्टेशन वरून वज्रेश्वरी मंदिरा जवळील फाट्यावर यावे. तेथून मंदाकिनी डोंगरावर जायला रिक्षा मिळते. केळठण गावापर्यंत संपूर्ण रिक्षाचे दोनशे रुपये भाडे आकारतात.
मंदाकिनी डोंगराच्या भटकंती सोबतच गरमपाण्याच्या कुंडां साठी प्रसिद्ध असलेल्या, अकोली, वज्रेश्वरी, गणेशपुरी ह्या तीर्थक्षेत्रांचे दर्शन आपण घेऊ शकतो. ही सर्व तीर्थक्षेत्र आणि मंदाकिनी डोंगर या मधील अंतर चार किलोमीटर पेक्षा जास्त नाही आहे. त्यामुळे व्यवस्थित आखणी केल्यास तीनही तीर्थस्थळांबरोबर मंदाकिनी डोंगराची भटकंती एका दिवसात होऊ शकते.
मंदाकिनी डोंगराच्या भटकंतीसाठी वर्षाऋतू सर्वात उत्तम राहील पण अतिवृष्टी असेल तर या भागात येणे टाळावे. तुम्ही येथील नद्या-नाल्यांच्या पुरामध्ये अडकू शकता. पावसाळ्यानंतर स्वतःचे वाहन असल्यास मंदाकिनीच्या पायथ्याखाली नदीपर्यंत येता येते.
प्रथमच येथिल स्थळाना भेट देत असल्यास स्थानिकांची मदत घेणे उत्तम, कारण इथे ढोरवाटा भरपूर असल्यामुळे चुकण्याची शक्यता जास्त आहे. येथे येताना संपुर्णपणे गूगल बाबावर विसंबून न राहता स्थानिकांचे मार्गदर्शन घ्यावे, आमची संपूर्ण भटकंती गावातील स्थानिकांच्या मार्गदर्शनाखालीच यशस्वीरित्या पार पडली. मंदाकिनी डोंगरावरील ही भटकंती आमच्या गाईडशिवाय आमाला पूर्ण करता आली नसती.
मंदाकिनी डोंगर उतरण्यास आधीच उशीर झाला असल्यामुळे जास्त न रेंगाळत थेट मुंबई गाठण्याचा निर्णय आम्ही घेतला. पुढच्या भटकंतीत अश्याच एखाद्या ऑफबीट ठिकाणाला भेट देण्याचा विचार मनात रेंगाळत होताच. पाहू पुढली भटकंती कुठली होते ते. तोपर्यंत इथेच थांबतो.