ब्रम्हगिरी आणि आम्ही अनुभवलेली गुप्तगोदावरी | Brahmagiri and the Gupt Godavari we experienced | भ्रमर
नाशिक मधील त्र्यंबकेश्वर मंदिराशेजारी ब्रम्हगिरी या नावाने वसलेला सुपरिचित गड आहे. गडाचा संपूर्ण सुळकासदृष्य प्रदेश ब्रम्हगिरी पर्वत म्हणून ओळखला जातो. नैसर्गिक सौंदर्याचं वरदान प्राप्त झालेल्या या गडाला ऐतिहासीक महत्व तर आहेच किंबहुना त्याहीपेक्षाही जास्त धार्मिक आणि पौराणिक महत्त्व लाभले आहे. येथील परिसरात काही महत्त्वाच्या पौराणिक आख्यायिका घडल्या आहेत असे मानले जाते.
त्या आख्यायिकांपैकी गोदावरी नदीच्या उगमाची पौराणिक आख्यायिका प्रसिद्ध आहे.
संपूर्ण ब्रम्हगिरी पर्वत परिसर हा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वराचा अविभाज्य भाग म्हटले तरी चालेल कारण पुरातन मान्याते नुसार ब्रम्हगिरीला प्रदक्षिणा केल्याशिवाय त्र्यंबकेश्वर तीर्थ यात्रा पूर्ण होत नाही. वर्षा ऋतूत गडाचे सौंदर्य दृष्ट लागाण्या सारखे असते. ब्रम्हगिरीचा संपुर्ण परीसर हिरवागार शालू नेसून रानफुलांनी बहरतो आणि ब्रम्हगिरीच्या कातळ सुळक्यांचा ढगांसोबत लपंडाव सुरु असतो. महादेवाच्या जटेमधून अवनीवरती गंगेने झेप घ्यावी तशी ह्या महादेवाचे ब्रम्हगिरीच्या माथ्यावरून असंख्य जलप्रताप झेप घेत असतात. ब्रम्हगिरीच्या माथ्यावरून दक्षिण गंगा म्हणून प्रसिद्ध असलेली गोदावरीसोबतच अहिल्या आणि वैतरणा नद्यांचाही उगम होतो.
ब्रम्हगिरीच्या पायथ्याशी कड्याजवळ गंगाद्वार, कोलंबिकादेवी मंदिर, अहिल्यागुंफा, गहिनीनाथ आणि निवृत्तीनाथांच्या भेटीची साक्षीदार असलेली गोरक्षनाथ गुंफा आहे. या तीर्थक्षेत्राचे दर्शन घ्यावे आणि ब्रम्हगिरीच्या कातळात कोरलेल्या पायऱ्यांवरून गडाच्या महादरवाज्यातून गडमाथ्यावर यावे. माथ्याच्या पठावरुन उजव्या बाजुस भंडारदुर्ग खुणावतो तर डाव्या दिशेस अंजनेरी आणि हरिहर गडांचे दर्शन होते.
गडाच्या माथ्यावरून समोर पसरलेले पंचलिंगीशिखर दृष्टीस पडते. पंचलिंगीशिखराच्या उजव्या बाजूंनी टेकडीच्या माथ्यावर चढावे आणि माथ्याजवळील सिद्धगुंफेचे दर्शन घ्यावे. सिध्दगुंफेचे दर्शन घेऊन टेकडीच्या माथ्यावरून पश्चिम बाजूला रेलिंगचा साह्याने खाली उतरल्यावर ब्रम्हगिरी मंदिराजवळ पोहचावे. ब्रम्हगिरी मंदिरात महादेवाची पिंड, गंगादेवीची मूर्ती आणि गोमुखातून वाहणारी गंगा यांचे दर्शन घेऊन ब्रम्हगिरी मंदिराच्या पुढच्या दिशेने मार्गस्थ होऊन गौतमीगंगा उगमस्थानी पोहचावे. या ठिकाणी पौराणिक आख्यायिकेप्रामाणे गौतमऋषींच्या "गो" हत्येच्या पातक मुक्तीसाठी गंगा ब्रम्हगिरीवर अवतारली अशी धारणा आहे.
या कुंडास गौतमी गंगा म्हणतात आणि गो-हत्येच्या पातक मुक्तीसाठी अवतरली म्हणून गोदावरी.
गौतमी गंगेचे दर्शन घेऊन पंचलिंगीशिखराच्या खालून उत्तर दिशेस जाणाऱ्या वाटेणे जटा मंदिराकडे जावे. मंदिरात शंकराने क्रोधित होऊन पर्वतावर जटा आपटून गंगेस प्रगट होण्याचे आव्हान केले. त्या जठा आपाटल्याच्या खुणा मंदिरात दाखवल्या जातात.
येथे पर्यंत आपली ब्रम्हगिरी पर्वतावरील धार्मिक यात्रा पूर्ण होते. आपल्या भटकंतीत थोडा थरारक अनुभव घेण्याची इच्छा असेल तर पुढे उत्तरेस दुर्ग-भंडारच्या भ्रमंतीस जावे.
संपूर्ण ब्रम्हगिरीच्या यात्रेत गंगेच्या प्रगट आणि लुप्त होण्याच्या कथा ऐकायला मिळतात. दक्षिणगंगा गोदावरी गौतमी गंगेच्या कुंडात उगम पावून लुप्त होते. पुन्हा गंगाद्वारा कुंडात उगम पावते तिथे लुप्त होऊन त्र्यंबकेश्वर मांदिरा जवळील कुशावर्त कुंडात प्रकट होते. या प्रकट आणि लुप्त होण्याच्या कथाचे मुळ ठिकाण कुठे असेल तर महादरवाज्याच्या दक्षिणेस काही अंतरावर पावसाळ्यात तयार होणाऱ्या सुंदर अशा गोलाकार तलावात असावे असे वाटते.
जशी लाव्हारसातून तयार झालेल्या घडयांमुळे शंकाराच्या जटाआपटल्याची लोकांच्या मनात आख्यायिका तयार झाली तशीच गोदावरीच्या लुप्त प्रगट होण्याची आख्यायिका बहुधा याच सुंदर तलावाला पाहून सुचली असावी. या छोट्याशा गोलाकार तळ्याचे वैशिष्ट्य असे की तळ्याच्या पाण्याचे ओढ्यामध्ये रूपांतर होऊन बाहेर न पडता तळ्यातील कातळात एका छोट्याश्या बिळामध्ये खळखळत कातळ खडकात लुप्त होऊन जाते. कातळातून पाणी कुठे बाहेर पडते त्याचा ठावठिकाणा ही लागत नाही.
पंचलिंगीशिखराच्या खालील हिरव्यागार शालूमध्ये कोंदण करून नीलमणी ठेवावा असे तलावाचे सौंदर्य मनमोहून टाकते. या ठिकाणी भाविक आणि पर्यटकांची वर्दळ नसल्याने शांततेमुळे येथील सौंदर्य आणखीनच खुलून येते. खऱ्या अर्थाने लुप्त होणाऱ्या गोदावरीची ही निसर्गनिर्मित कलाकृती अनुभवायची असेल तर ब्राम्हगिरीला वर्षा ऋतूत भेट द्यावीच लागेल.
आमच्या संपूर्ण ब्रम्हगिरी भटकंतीचा विडीओ👇
सहभाग-:
१) विलास परब
२) लतेश जाधव
३) रवी सावंत
४) शैलेश सावंत
ब्रम्हगिरी पर्वत