भ्रमर




 भ्रमण करतो तो भ्रमर ही साधी सोपी व्याख्या असलेलं संधिपाद षट्पाद किटकाला संकृत काव्य, नाट्य ते संतकाव्य, भक्तीगीत, भावगीत इतकेच नव्हेतर प्रेमगीतामध्ये मानाचे स्थान दिसून येते त्याच्या कडून निसर्ग भटक्याना बरेच काही शिकण्यासारखे आहे .

प्राचीन योगशास्त्रातील अष्ट कुंभकामध्ये, म्हणजेच प्राणायाममध्ये तर भ्रमराच्या आवजाचे अनुकरण करणाऱ्या भ्रामरी प्राणायामची प्राचीन योग्यानी निर्मिती केली आहे.

महाभारतातील आदिपर्वावरुन लिहलेल्या महाकवी कालिदसाच्या शाकुंतलमध्ये शकुंतलेच्या अवतीभवती भुंण-भुंण करणारा भ्रमर दुष्यंतला तिच्याशी सलगी करण्यास मदत करतो तर त्याच महाभारतातील कर्णाची मांडी पोखरणाऱ्या इंद्ररुपी भुंग्यामुळे ब्रम्हास्त्र विसरण्याचा शाप परशुरामाकडून प्राप्त होतो.  

आपल्या ज्ञानोबा माऊलींच अभंगातली रुपकासाठी भ्रमरावर जास्तच प्रेम दिसून येते. माऊलींच्या अनेक अभंगांमध्ये भ्रमराचे रुपक वेगवेगळ्या अर्थाने पेरलेली  दिसतात  .

रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा ।
सांडीं तूं अवगुणु रे भ्रमरा ॥

लतादीदींच्या गोड आवाजातील माऊलींचा हा अभंग सर्वशृत आहे. या अभंगात श्री माउली मनास भ्रमराची उपमा देत भ्रमर रुपी मनास षडरिपु बाजुला सारून भौतीक सुखातून बाहेर पडून विठ्ठलास शरण येण्यास सांगतात.

परीमळाची धाव भ्रमर ओढी |
तैसी मज लागो तुझी गोडी ||१||

वरील दोन अभंगा प्रमाणे भ्रमराचे रुपक अनेक ठिकाणी माऊलींनी आपल्या अंभगात पेरले आहेत . 

संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचं पुढील उदाहरण.

एकविध सुख घेती नित्य बाळा । भ्रमर परिमळालागी तैशा ॥२७॥
तैसा त्यांचा भाव घेतला त्या परी । तुका म्हणे हरि बाळलीला॥२८॥ 

संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराजांसह अनेक संतांनी संतकाव्यात भ्रमरचा रुपक म्हणून सर्रास वापर केलेला दिसून येतो.

उत्तर भारतीय हिंदी भाषिक पट्यात भ्रमरगीत काव्याची मोठी परंपरा आहे. हिन्दी मध्ये सूरदास, नंददास, परमानंददास, मैथिली शरण गुप्त (द्वापर) आणि जगन्नाथदास रत्नाकर यांनी भ्रमरगीताची रचना केली आहे. 

भ्रमर भक्तीगीतामध्ये महाभारतातील पुढील कथेचा आधार घेतला जातो. श्रीकृष्णाचा संदेश घेऊन उध्दव गोकुळात जातो. तेव्हा  तेथे गोपिका त्याला कृष्णाबद्दल विचारतात तेव्हा उध्दव निराकार ब्रम्ह योग ज्ञानाच्या गोष्टी त्याना सांगतो तेव्हा रागवलेल्या गोपिका उध्दवाला काळ्या भुंग्याची उपमा देत कृष्णाबद्दल असलेल्या प्रेमाची महती सांगतात. कधी कधी त्या कृष्णालाच भ्रमर म्हणतात. उध्दव आणि गोपिकांच्या चाललेल्या योग आणि प्रेमाच्या युक्तीवादी द्वंद्वावाच्या भक्तीपर काव्याला भ्रमरगीत म्हणतात. भ्रमर गीतामध्ये शंभर पेक्षाजास्त ओव्या असू शकतात.

carpenter bee


भ्रमराच्या प्रेमापासुन प्राचीन महाकवींपासून ते आर्वचिन चित्रसृष्टीतील आधुनिक कवी ही सुटले नाही.

दिल का भंवर करे पुकार 
प्यार का राग सुनो, 
प्यार का राग सुनो रे...
ह्या गाण्यावर देवानंद भ्रमर बनून नुतनच्या भोवती पिंगा घालताना दिसतो तर 

ओ मनचली, कहाँ चली
ओ मनचली, कहाँ चली
देख देख देख देख मुझ से न शरमा
एक एक एक मैं हूँ भंवरा ओ और तू कली
म्हणत संजीव कुमार लीना चंदावरकरला छेडताना दिसतो.

मी भवरा तू फुल किंवा मी फुल तू भवरा अशा अर्थाने युगलगीत लिहणारे असंख्य कवी आणि कवयीत्री सर्व भाषेमध्ये होते, आज ही आहेत आणि उद्या ही असतील.

सर्व प्रकारच्या महाकवींवर एवढी मोहिनी ह्या भ्रमराने घातली. ह्या काळया तुळतुळीत भुंण भुंण करणाऱ्या किटकामध्ये असे काय रहस्य दडलेले आहे. सामन्य जणांसाठी एक सर्वसाधारण काळा भुंगा असलेला, मात्र साहित्यिक मंडळींंमध्ये रंगाने कृष्णवर्णी शामवर्णी तेजस्वी वाटतो आणि भ्रमर, मिलिंद, मधुकर या नावाने साहित्यांंमध्ये वावरतो. हो आणि त्याचा भुण भुण आवाज त्यांना मधुर गुंजन वैगरे वाटते.

षट्पाद किटकाच्या हजारो प्रजाती जगात आस्तित्वात असतांना भ्रमरावर हे सगळे मोहित का बरे झाले असावे. मधमाशी आणि गांधिल माशी पण आहेत की. गांधिल माशी चांगले गोल मोठे घरटे बांधते आणि भुंण भुंण ही करते. मधमाशी मेहनत करुन झाडावर किंव्हा कड्यावर छान पोळे बांधते आणि  मधाचा मोठ्या प्रमाणात साठाही करते हे कोणाला जमेल तरी काय ?  तुम्ही काय म्हणतात ते गुंजन वैगरे ते पण करते हो. दिसायला पण उजवी काळ्या पिवळ्या पट्याने रंगवलेले तुकतुकीत शरीर त्या लाकूड पोखरुन राहणाऱ्या गणाच्या (झायलोकोपिडी) काष्ठनिवासी काळ्या कुळकुळीत भुंग्याची ह्यांच्याशी काय बरोबरी होईल?

कामगारांच्या वसाहतीत राहणाऱ्या व एका राणी माशीच्या आज्ञेनुसार काम करणाऱ्या नोकरांची एका फुलावरुन दुसऱ्या फुलावर स्वमर्जीने फिराणाऱ्या मनाचा राजा असणाऱ्या भ्रमरासोबत बोरोबरी होईलच कशी.

काव्य कथा राजकुमार राज कन्येवर रचली जातात. दास दासी दिवसभर वेटबिगार करुन येणाऱ्या कामगारांंवर जास्तीत जास्त रस्त्यावरील पथनाट्य नाहीतर एकाद दुसरं सामंतर नाटक किंवा चित्रपट त्यांचे प्रेक्षक वर्ग पण किती साधारण पाच पंचवीसच असतील. मधमाश्यांंना जरा असुरक्षित वाटलं की जसे कामगार झुंडी ने मोर्चा काढून दगड फेक करतात तसे ह्या लोकांवर झुंडी ने दंश करतात. ह्यांच्या ह्या अशा वागण्याने कोण बरं देईल यांना काव्यात स्थान. भुंग्याबद्दल कधी ऐकलं आहे का, की यांनी झुंडीने दंश केला म्हणून. नाही म्हणतो एखाद दुसऱ्या भुंग्याने कोणाला दंश केल्याची फुटकळ गोष्ट झालीही असेल पण त्याची चुक नसणार हो. एखाद्या लबाड माणसानेच त्याची काहीतरी खोडी काढलेली असणार. मधमाशांच्या राणीमाशीबद्दल तर विचारुच नका. बिचाऱ्या कामकरी माशांच शोषण करून त्यांच्या पेक्षा दुप्पट फुगलेली, आयतं खाऊन निव्वळ सरंजामी शोषण व्यवस्थेचे मूर्तीमंत प्रतिकच जणू मग काय बरं लिहणार हो तिच्यावर.

निसर्गावर प्रेम करत भ्रमण करण्याची कला निसर्ग प्रेमींनी शिकावी ती भ्रमराकडून. कुठचे बंधन नाही एका फुलावर स्थिर नाही वनात जाऊन फुलावर अलगद बसून मकरंदाचा अस्वाद घेऊन हळुच दुसऱ्या फुलाकडे मकरंदासाठी जातो. तिथे त्याला जर मधुकण नाही भेटले तर उगीचच माकडासारखे मर्कट चाळे करत बगिच्याची नासधूस करत फिरत नाही. मधुकण मिळाला तर सात पिढ्यांच्या बेगमिच्या साठी मकरंदावर डल्ला न मारता, फुलातील मकरंद हवा तेवढाच आस्वाद घेतो. तेही फुलाला कसलीही हानी न करता. एकाच फुलात न गुंतता गुंजनाचे संगीत गात गात आवडेल त्या फुलाचा आस्वाद घेत आणि परागीभवनाचे पुण्य पदरात पाडून घेतो.

निसर्गात फिरतना टोळधाडी सारखे फिरु नये. त्या जशा शेताची नासधूस करत फिरतात तशाच फिरस्त्यांच्या झुंडीही करतात. पर्यटनस्थळांची हानी करत फिरतात तशी टोळधाड नसावी. भुंगा कधी मोठ्या झुंडीत सहसा दिसत नाही. भ्रमराच्या प्रवसाला भ्रमंती उपमा देतात कारण तो मधुकणाचा आस्वाद घेऊन झाल्यावर पाऊल खुणाही मागे ठेवत नाही. किटकांच्या असतात त्या टोळधाडी, भुंग्यांंची मात्र असते ती भ्रमंती.

टोळधाडी वरुन आठवल किटकांंमध्ये एक प्रकार आहे त्या मध्ये वाळवी, पिंगाणी वैगरे वैगरे, तत्सम किटक येतात.एरवी बाकीच्या ऋतूत जमिनीवर रेंगताना दिसणाऱ्या किटकांंना जसा पावसाळा आला की पंख फुटतात आणि हे रांगणारे जीव उडू लागतात. त्यांना दिव्याच्या प्रकाशाचं आणि आगीचं इतकं आकर्षण किंवा हवेतर वेड म्हणा. ते किटक एखादया केरोसीन किंवा तेलाच्या दिव्याकडे ही या वेडाच्याभरात झेप घेतात त्यातले काही आपल्या जिवाची अग्नीदेवास आहुती देऊन बसतात. पावसाचे काही दिवस गेले त्यांचे पंख आपोआप गळून जातात व हे किटक पुन्हा जमिनीवर रेंगायाला सुरुवात करतात.  
त्याचप्रमाणे काहीसा प्रकार आपल्या पावसाळी भ्रमंतीस दिसून येतो. जसे वाळवीला पावसात पंख फुटतात तसेच काहीना पावसाळ्यातच निसर्ग प्रेम उफाळून येतं. पावसाळी बेडकांंप्रमाणे पावसाळी ट्रेकर्स नावाची ही जमात. पिंगाणि जशी एकाद्या दिव्या जवळ जमते, तसे या जमातीतील लोक एखाद्या ट्विटरवर अथवा  फेसबुकवर प्रसिद्ध झालेल्या पावसाळी पर्यटनस्थळांंवर आणि धबधब्याजवळ बेशिस्त झुंडीने जमातात. त्यांच्यामध्ये निसर्गप्रेमा पेक्षा समाज माध्यमावर लाईक मिळणे हाच जणु ह्यांचा मुख्य उदेश असतो. आणि हो या लाईकच्या नादापाई फोटो काढताना एकाद दुसरा अपघातही घडतो.

जो पुढचा पावसाळी वाळवी रुपी मानवी प्रकार आहे तो यापेक्षा भयानक असतो. या प्रकारात बेशिस्त मदिरा प्रेमींचे जलप्रवाह, जलप्रतापाच्या ठिकाणी जत्थेच्याजत्थे जमून थेट जल पात्रातच विराजमान होऊन मदिरे संग सामिष आहाराची मेजवानीचा थाट थाटतात. एकदा का मदिरेची धुंदी अंगात भिनली की, स्पायडरमॅन सुपरमॅनच्या पुढची दिव्य शक्ती प्राप्त झाल्याचा यांंना आभास होऊन कुठलीही अचाट कामगिरी करण्याची ऊर्मी यांच्यात जागृत होते.

पिंगाणी जशी दिव्यांवर झेप घेऊन अग्नीत समर्पित होता तसेच हे उच्च कोटीचे वीर मद्यधुंद ऊर्मित जलप्रपात झेप घेत जलदेवतेत समर्पित होतात आणि शासकीय यंत्रणेस शोध मोहीमेसाठी कामाला लावतात.

समजून-समजावून वैतागलेली शासन व्यवस्था नंतर संपूर्ण परिसर पुढील संपूर्ण पर्जन्य ऋतूत पर्यटनास निषिद्ध म्हणून घोषित करून खऱ्या निसर्गप्रेमींच्या आनंदावर विरजण घालते. प्रसिद्ध म्हणीप्रमाणे सुक्या बरोबर ओलेही जळते म्हणतात ना ते असे.

गिरिभ्रमंतीत एखादा अपघात आपण समजू शकतो पण पिंगाण्यासारखं आगीत स्वतःहून झेप घेऊन आप्तीला आमंत्रण देण्याला आत्महत्या आणि धादांत मूर्खपणा म्हणतात. यांचं निसर्गप्रेमही पिंगाण्याच्या पंखा सारखचं असत पावसाळी उगवणारं. पावसाळ्याचे दोन महिने जाताच यांची संख्या रोडावते पावसाळा संपेपर्यंत लुप्त झालेली असते मग ते उजाडतात ते थेट दुसऱ्या पावसाळ्यातच.

एका ऋतूपुरती मर्यादित असलेल्याला निसर्ग प्रेम म्हणून शकतो का? प्रत्येक ऋतूत निसर्गाची वेगळी रूपे अनुभवायला मिळतात. निसर्गाच्या सहा ऋतूंंचे सहा सोहळ्याचा आस्वाद घेत भ्रमरासारखे फिरणे म्हणजे भ्रमंती.

जर तुम्ही भ्रमरासारखे फुलावर प्रेम करत असाल तर ते फुल तोडनार नाही तेथेच रंग, रुपाचा त्याच्या सुगंधाचा आस्वाद घ्याल पण त्या फुलाला झाडावर राहू द्याल ह्यालाच आपण खर निसर्ग प्रेम म्हणू शकतो. 

म्हणूनच म्हणतो निसर्ग भ्रमंती असावी ती भ्रमारा सारखी. मर्कट चाळे किंवा टोळधाड केव्हाही नसावी.

[ तळ टिप - हा भ्रमर काव्यातील असून खऱ्या जीवशास्त्रातील भ्रमराशी साम्य दिसल्यास किंवा त्याच्या विरूध्द वागत असल्यास जिवशास्त्रीय भ्रमराची चुक समझावी 😜]