नाइट ट्रेक नाणेघाट ते जिवधनगड ( दिनांक १२, १३, ऑक्टोंबर २०१९ ) | भ्रमर
अरुण आणि संतोषने कोजागिरी पौर्णिमेचा योग साधून नाणेघाट - जीवधनचा नाइट ट्रेक प्लॅन केला होता. शनिवारी रात्री निघायचे असल्याने मला नाही म्हणायचे काही कारण नव्हते. माझ्या बरोबर संदेश, विजय आणि अशित ट्रेकला यायला तयार झाले होते तर अरुणचा दहा वर्षाचा मुलगा आर्यन त्याच्या सह्य भटकंतीमधील पहिल्याच नाईट ट्रेकसाठी खूपच उत्साही होता. ठरल्याप्रमाणे शनिवारी रात्री कल्याणला जमा झालो. संदेशची गाडी कल्याणच्या दुर्गाडी पुलावरील ट्राफिक मध्ये अडकल्यामुळे नियोजित वेळेपेक्षा बराचसा उशीर झाला होता.
संदेश येताच अरुण आणि संदेशच्या गाड्यांमधून आमचा आठ जणांचा चमू कल्याण - अहमदनगर राष्ट्रीय मार्गावरून नाणेघाटाकडे निघाला.
माळशेज घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या वैशाखरे गावाच्या पुढे २ कि. मी. वर असलेल्या नाणेघाटाच्या नामनिर्देश फलकाजवळ पोहोचेपर्यंत मध्य रात्रीचे १२ :४५ झाले.
कोजागिरीच्या आदल्या रात्री पाऊणच्या सुमारास विजेरीच्या (बॅटरी) आणि शीतल चांद्र प्रकाशाच्या सोबतीने आमची नाणेघाटाच्या दिशेने वाटचाल सुरु झाली. पौणणिमेच्या शीतल प्रकाशात कृत्रिम विजेरीच्या प्रकाशाची गरज तितकीशी भासत नव्हती.
जंगलातून जाणारा प्रशस्त रस्ता दिसत होता, वनखात्याने वाटेत जागोजागी वन्यजीवांच्या माहितीचे फलक लावले होते त्या नुसार आम्ही वाट चालत होतो, पण येथेच आमची अजाणतेपणी चूक झाली. आम्ही प्रचलित जुनी वाट सोडून वनखात्याने बनवलेल्या वाटेला लागलो हे आम्हाला एका वनखात्याने पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी बनवलेल्या एका तलवाजवळ पोहोचल्यावर जाणवले. तलाव मागे टाकून पुढे गेल्यावर आम्ही वाट शोधण्यास सुरुवात केली.
कोजागिरीच्या आदल्या रात्री पाऊणच्या सुमारास विजेरीच्या (बॅटरी) आणि शीतल चांद्र प्रकाशाच्या सोबतीने आमची नाणेघाटाच्या दिशेने वाटचाल सुरु झाली. पौणणिमेच्या शीतल प्रकाशात कृत्रिम विजेरीच्या प्रकाशाची गरज तितकीशी भासत नव्हती.
जंगलातून जाणारा प्रशस्त रस्ता दिसत होता, वनखात्याने वाटेत जागोजागी वन्यजीवांच्या माहितीचे फलक लावले होते त्या नुसार आम्ही वाट चालत होतो, पण येथेच आमची अजाणतेपणी चूक झाली. आम्ही प्रचलित जुनी वाट सोडून वनखात्याने बनवलेल्या वाटेला लागलो हे आम्हाला एका वनखात्याने पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी बनवलेल्या एका तलवाजवळ पोहोचल्यावर जाणवले. तलाव मागे टाकून पुढे गेल्यावर आम्ही वाट शोधण्यास सुरुवात केली.
सुदैवाने काही वेळातच डोंगराच्या डाव्या बाजूला नाणेघाटाची बांधीव वाट सापडली. दहा वर्षांपूर्वी कल्याणच्या ग्रुप बरोबर वाट माहित नसतानाही मार्किंगच्या जोरावर याच वाटेने नाईट ट्रेक केला होता पण आता मात्र वनखात्याच्या रस्त्याने भूलचूक झाली होती.
विशेष सूचना:
कोकणातुन नाणेघाट चढताना ओहोळ क्रमांक दोन जवळ चुकायची नेहमीच शक्यता असते. कोकणातुन येताना उजव्या बाजूची पायवाट वनखात्याने वननिरीक्षणासाठी तयार केलेली वाट आहे. त्या वाटेने चुकण्याची शक्यता जास्त असल्याने डाव्या बाजूची वाट पकडून नाणेघाटास जावे. डावीकडील वाट पारांपारिक जुनी वाट थेट सरळ आणखी एक ओहळ पार केल्यावर डोंगर धारेने नाणेघाटात जाते. तसेच त्या वाटेवर ठिकठिकाणी मार्किंग केलेल्या आहे.
आता वळणावळणाची नाणेघाटाची प्रचलित पायऱ्याची वाट चालु झाली होती. ही वळणाची वाट संपण्याचं मात्र नाव घेत नव्हती.
पोर्णिमेच्या प्रकाशात नाणेघाटाच्या प्रवेशद्वारावरील अजस्र सुळका आंगठ्याच रुप घेउन जणूकाही आमचा दिशादर्शक बनून उभा होता. काही वेळेच्या चालीनंतर वाटेतील सातवाहनकालीन पाण्याच्या कातळात खोदलेल्या टाक्या दिसू लागल्या ज्या आम्हाला नाणेघाटला पोहोचल्याची साक्ष देत होत्या.
नाणेघाटाजवळील गुंफेजवळ पोचल्यावर विजयश्री अंगात संचारावी तशी आमची पाऊले पठाराच्या दिशेने पडू लागली.
नाणेघाटाच्या पायऱ्यांची दमछाक सोडल्यास रात्रीचा हा प्रवास हसत खेळत आरामदायी झाला. आपाआपल्या क्षमतेनुसार एक एक करत आमचे सर्व सवंगडी भल्या पहाटे चार वाजता नाणेघाटाच्या शिंगरू पठारावर दाखल झाले. वैशाखरे जवळील नाम फलकापासून नाणेघाटाच्या शिंगरु पठारा पर्यंतच्या संपूर्ण प्रवासाला अंदाजे अडीच ते तीन तासाचा कालावधी लागतो.
पठारावर पोहचताच सगळ्यांनी कातळावर पाठ टेकून चांदण्यांची गोंदण असलेल्या निळ्या छताखाली एक दोन तास निद्रादेवीला प्रसन्न करायचा प्रयत्न सुरू केला. पण सुरूवातीला आल्हाददायक वाटणाऱ्या हवेचे रूपांतर नंतर बोचऱ्या थंड हवेत होऊन निद्रादेवीला प्रसन्न करण्याचे स्वप्न अल्पावधीतच पठारावरील थंड हवेत विरुन गेले.
अरुण आणि स्नेहल वाहिनीनी आणलेल्या गरम गरम मसाले दुधाने मात्र या थंडीची बोच बऱ्याच प्रमाणात कमी केली. त्यापाठोपाठ सुक्या खाऊच्या पिशव्या पटापट उघडू लागल्या. त्यामुळे शरीरात बऱ्यापैकी उष्णता जाणवू लागली होती.
नाकासमोरच प्राचीनकाळाासून नाणेघाटातून व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या धनाची आणि जीवाची रक्षणाची जबाबदारी शतकानुशतके पेलणारा बेलाग जीवधनगड पोर्णिमेच्या प्रकाशात आम्हाला खुणावत होता. आम्हाला आता तिकडे जाण्याचे वेध लागले होते.
सकाळी साडेसहाच्या सुमारास आम्ही जीवधनगडाच्या पायथ्याशी असलेल्या रिव्हर्स वॉटर फॉलच्या दिशेने आमची वाटचाल सुरु केली. नाणेघाटाजवळून एक बऱ्यापैकी रुळलेली प्रशस्त पायवाट जीवधनच्या दक्षिण टोकाजवळील पठाराच्या दिशेने जाते. त्या पायवाटेवर रिव्हर्स वॉटर फॉल नामनिर्देशन फलक आहे.
त्या वाटेने चालत गेल्यावर दहा मिनिटांमध्ये रिव्हर्स वॉटर फॉल जवळ आम्ही पोहोचलो. ह्या ठिकाणाहून कड्याच्या टोकावरून कोकणाच्या दिशेने झेपावणाऱ्या ओढ्याच्या पाण्याला दरीत शिरणारा खट्याळ वारा तेवढ्याच जोरकसपणे विरुद्ध दिशेला फेकून देतो. पावसाळ्यात चालणाऱ्या ह्या वायु-जल देवतेच्या जुगलबंदीचा आनंद घेण्यासाठी भरपूर पर्यटक येथे हजेरी लावतात.
पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्याची गैरहजेरी, तसेच पर्जन्य ऋतु नुकताच संपला असल्याने ओढ्याला पुरेसे पाणी नव्हते. त्यामुळे आम्हाला मात्र निसर्गाच्या खेळाचे दृश्य पाहण्याचे भाग्य लाभले नाही.
कड्यावरुन दिसणाऱ्या कोकणातील निसर्ग सौंदर्याला कुठल्याही ऋतूचे बंधन नसल्याने मनसोक्त डोळ्या मध्ये सामावून घेतले आणि रिव्हर्स वॉटर फॉल जवळून जीवधनगडाच्या दक्षिण टोकाजवळील वानर लिंगीच्या दिशेने झाडीतुन जाणाऱ्या वाटेने मार्गस्थ झालो. पहाटे काही वेळच्या विश्रांतीने रिफ्रेश झालेला आमचा छोटा मावळा आर्यन टुणुक टुणुक उड्या मारत सर्वात पुढे चालत होता.
उभ्या चढाची असलेली ही वाट काही वेळातच आपल्याला गडाच्या कातळ कड्यात कोरलेल्या पायऱ्या पर्यंत आणून सोडते. इथून पुढे डाव्या बाजूस जाणारी कातळात खोदलेल्या पायऱ्यांंच्या मार्गाने आपल्याला गडमाथ्यावर घेऊन जाते तर,
उजव्या बाजूस जाणारी वाट आपल्याला वांदरलिंगी सुळक्याच्या पायथ्यापर्यंत नेते. आजच्या आमच्या भटकंतीचा पुढचा टप्पा जीवधनगडाचा माथा असल्याने आम्ही आपसूकच डाव्या बाजूने पायऱ्या असलेल्या मार्गाने गडाची वाट चालू लागलो. पायऱ्यावाटे हीच वाट पुढे आपल्याला थेट गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराला जोडणाऱ्या घळीपर्यंत घेऊन जाते आणि येथूनच जीवधनगडाच्या चढाईचा खरा थरार सुरु होतो.
एके काळी या घळीतून या कातळपायऱ्या अगदी नेटकेपणाने कोरून काढलेल्या होत्या. परंतु इतर काही दुर्दवी गडांप्रमाणे हाही गड जेव्हा इंग्रजांच्या ताब्यात गेला तेव्हा इंग्रजांनी गडावर जाणाऱ्या पायऱ्या सुरुंग लाऊन उडवून दिल्या, त्यामुळे येथे सहा ते सात फुटाचे प्रस्तरारोहण (क्लायम्बिंग) करावे लागते. पावसाळ्यात वाहते पाणी आणि शेवाळामुळे तुटलेल्या पायऱ्याची ही चढाई आणखीच अवघड बनते.
हा रॉक पॅच चढण्या उतरण्यासाठी काही दुर्गप्रेमीनी कायमस्वरूपी दोर सोडून ठेवला आहे. तरी नवख्या गडप्रेमींची हा पॅच बघून भीतीने गाळण उडते. तसं पाहता हा टप्पा काही इतका अवघड नसून, कधी अशा प्रसंगाला सामोरे न गेल्यामुळे प्रथमच आलेल्या गडप्रेमींना मात्र जरा धास्ती वाटते. आमचा मित्र आतिष अशा दुर्ग भटकंतीसाठी पहिल्यांदाच आला होता. त्याने हा कातळटप्पा पाहून वरती न येण्याचा निर्णय घेतला होता परंतु छोट्या आर्यन आणि प्रीतीला रॉक पॅच लिलया पार करताना बघून वर येण्यासाठी तयार झाला. अशा ठिकाणी आपल्या सहकार्यांना आत्मविश्वास देण्याची गरज असते आणि ते काम संतोष चांगल करत होता त्याने इतर ग्रुपच्या नवख्या मुलानाही हा पॅच चढण्यास-उतरण्यास चांगलीच मदत केली.
सहा सात फुटाचा रॉक पॅच पार केल्यावर उभ्या कातळात कोरलेल्या दक्षिणमुख प्रचंड अशा कल्याण दरवाजा जवळ आपण पोहोचतो.
कल्याण द्वाराच्या कमानीवर चंद्र ,सुर्य आणि मंगल कलशाची शुभचिन्ह कोरलेली आहेत. या द्वारातून गडप्रवेश करत आम्ही गडमाथ्यावर गडाच्या दक्षिण दिशेस असलेल्या वांदरलिंगी सुळक्याच्या दिशेने गडमाथा न्याहाळण्यासाठी मार्गस्थ झालो. गड चढताना वाटेत विपुल प्रमाणात फुललेली वर्षाकालीन रानफुले साथ देत होती.
त्यातही सोनकीच्या चिमुकल्या पिवळ्या रंगाची पेरण आणि तेरड्याच्या गुलाबी रंगाचा राजेशाही थाट काही औरच होता.
वेगवेगळ्या ऋतूत फिरताना सह्याद्रीच्या वेगवेगळ्या रंगाच्या छटा आपणास अनुभवायास मिळतात. ऋतुगणिक सह्यगिरी आपल रुपड पालटत असतो. पातळाचा ठाव घेणारे सह्याद्रीचे कातळकडे उन्हाळ्यात आपल्याला अंगावर धाऊन येणाऱ्या अक्राळविक्राळ योद्धा सारखे भासतात तर वर्षा ऋतुची चाहूल लागताच सह्याद्रीच्या रूपड्यात हळूहळू १८० अंशामध्ये बदल होतो. त्याच्या अंगा खांद्यावर असंख्य जलधारा खेळू लागतात आणि मध्येच एखाद्या कड्यावरून अल्लडपणे झेप घेतात. सह्याद्री हिरव्या रंगाच्या छटांचा शालू नेसु लागतो आणि एव्हाना राकट अशा यो ध्याचे स्वरूप जाऊन सह्यगिरीचे रूपांतर रुपगर्वितेत झालेलं असते. पुढे सप्टेंबर ऑक्टोबरची चाहूल लागताच हळूहळू हिरव्या रंगाच्या शालुवर विविध रंगी रानफुलांची कोंदण चालू होते. तेव्हा त्याचे सौंदर्य दृष्ट लागण्या सारखेच असते.
कधी कधी तर एकाच रंगाच्या फुलांच्या विविध रंगछटांनी सह्यपठारे रंगुन निघतात तर काही ठिकाणी वेगवेगळ्या फुलांची माळा गळ्यात घालून सह्यगिरी मिरवत असतो.
याची अनुभूती या वर्षी ब्रम्हगिरीला घेतलीच होती, पण आज जीवधनला दिलेल्या या भेटीने रंगछटांची उधळण काय असते हे या सह्याद्रीने आम्हाला दाखवले. येथे तर संपूर्णपणे जीवधनचा गडमाथाच बहरला होता. फुलण आणि बहरण यातील फरक आम्हाला खऱ्या अर्थाने इथे जाणवत होता.
गुलाब रंगी तेरड्याच्या फुलांची शाल पांघरलेल्या जीवधनवर असंख्य तथाकथित व्हॅली ऑफ़ फ्लॉवर ओवाळून टाकता येतील इतके दृष्ट लागण्यासारखे सौंदर्य गडावर नजर टाकू तिथे दिसत होते.
कल्याण दरवाजापासून पायवाट तुडवत आणि जिथे वाट लुप्त झाली तिथे रान तुडवत वांदरलिंगी सुळक्याजवळील कड्याजवळ आम्ही पोहचलो.
वांदरलिंगी सुळका प्रस्तरारोहकांचे आवडते ठिकाण असून ह्या सुळक्यावर रॉक क्लाइंबिंग रॅपलिंग बरोबर वॅली क्रॉसिंग सारखे साहसी खेळ होतात. येथूनच नानाचा अंगठा तसेच भिमाशंकरच्या दिशेने धावणाऱ्या सह्यरांगे वरील दुर्ग, ढाक, गोरखगड, सिद्धगडा सारख्या कोकणात उतरणाऱ्या घाटरस्त्यांचा पहारेकऱ्यांप्रमाणे धसईच्या छोट्याशा धरणाचे दर्शन घडते. वांदरलिंगी जवळील कड्याजवळ निसर्ग सौंदर्य न्याहळत आम्ही पोटपुजा केली आणि थोडक्यात गडाच्या इतिहासाचा मागोवा घेतला.
पुणे जिल्ह्यातील घाटघर गावाजवळ सह्यकडा समुद्र सपाटीपासून अंदाजे ३७५४ फुट थेट कोकणात उतरला आहे. त्याच डोंगरावर सातवाहन काळात नाणेघाटा द्वारे देशावरील जुन्नर ते कोकणातील कल्याण बंदरातून होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी जीवधन किल्याची निर्मिती झाली असावी.
शिवजन्माच्या वेळी जिवधनवर एक महत्त्वाची घटना घडली. १७ जून १६६३ रोजी निजामशाही अस्ताला जात होती. मुघल बादशहा शाहाजान आणि आदिलशाही संयुक्तिक फौजेने निजामशाहीची कोंडी करून शेवटचा अल्पवयीन वंशज "मूर्तिजा निजाम" याला जीवधन गडावर कैद केले. शहाजीराजांनी "मुर्तिजा निजामाला" जीवधन गडावरून मुक्त करून संगमनेर जवळील पेमगिरीवर नेऊन बादशहा बनवले व स्वतःला वझीर घोषित करून मुरुजला मांडीवर बसवून निजामशाहीचा कारभार पाहू लागले. शतकांच्या पारतंत्र्यानंतर राज्यशकट चालवण्याचा हा मराठ्यांचा पहिलाच प्रयत्न परंतु मुघल आणि आदिलशाहीच्या सयुक्तिक फौजांसमोर त्यांचा निभाव लागला नाही. शहाजीराजांचा पराभव झाला आणि त्यांना आदिलशाहीची चाकरी पत्करावी लागली. आदिलशहाने त्यांना दक्षिणेतील सुभेदारी देऊन महाराष्ट्रा पासून दूर पाठवले.
प्राचीन काळी सातवाहनांचा असलेला जीवधन त्यांच्या अस्तानंतर यादवांच्या मराठा साम्राज्याच्या भाग असावा. यादवांच्या अस्तानंतर बहामनी सत्ता प्रस्थापित झाल्यावर तो बहामनी राजवटीत आला. सन १४८५ मध्ये बहमनी साम्राज्याच्या अस्तानंतर निजामशाही स्थापन करणाऱ्या मलिक अहमदने उत्तर कोकण व पुणे प्रांतावर कब्जा घेतल्यावर सन १४८७ साली हा गड ताब्यात घेतला. मुर्तिजा निजामाची सुटका करून शहाजी राजांनी जीवधन ताब्यात घेतला. मुघल आणि निजामाच्या सयुक्तिक फौजांनी शहाजीराजांचा पराभव केल्यावर आदिलशाही कडे गड परत आला. त्यानंतर शिवाजी राजांच्या काळापासून गड मराठ्यांच्याच ताब्यात होता, मराठेशाहीच्या अस्तानंतर १८१८ मध्ये गड इंग्रजांच्या ताब्यात गेला .
वांदरलिंगी जवळील कड्या जवळ पोटपुजा करून आम्ही गडाच्या पूर्व दिशने गड न्याहाळण्यासाठी निघालो.
गडाच्या पुर्व दिशेला आल्यावर दक्षिणेस जाणाऱ्या वाटेच्या दोन्ही बाजूस दोन समाध्यांच दर्शन घडते.
समाध्यांच्या इथून पुढे चालत गेल्यावर आम्ही एकेकाळी गडाचे मुख्य देवस्थान असलेल्या परंतु सध्या झाडीत लपलेल्या बालेकिल्ल्यावरील गडदेवता जिवाई देवीच्या मंदिराजवळ पोहोचलो. काळाच्या ओघात देवीच्या मंदिराची संपूर्ण पडझड झाली असून आभाळाचे छत बनवून देवीची भग्नावस्थेतील मूर्ती इथे वसली आहे. या गडदेवतेला आम्ही पामर काय फुले वाहणार? निसर्ग देवतेने मूर्तीसह संपूर्ण मंदिर परिसरच रानफुलांनी सुशोभित केला होता.
श्री जिवाई देवीच्या मंदिरा जवळून पुढे होत आम्ही पूर्वेच्या बाजूस असणाऱ्या पाण्याच्या टाक्यांचा समूह आणि मंदिर सदृश्य धान्य कोठाराची वास्तू दिसते तेथे पोहोचलो. धान्य कोठाराच्या दिशेने न जाता प्रथम कोठाराच्या दक्षिण दिशेस पाच टाक्यांचा समूह आहे तो पाहण्या साठी आम्ही गेलो. वनखात्याने गडावरील मुख्य वास्तूचे नामनिर्देशित फलक प्रत्येक वास्तूजवळ लावले आहेत त्याचा फायदा गड न्याहाळताना निश्चीत होतो.
पाच टाक्यांचा समूह पाहून झाल्यावर आम्ही धान्य कोठारात प्रवेश केला. धान्य कोठारात एकामागे एक अशी तीन दालने असुन मधल्या भागात डाव्या-उजव्या बाजुस एकेक दालन आहे. ही सर्व मिळुन एकुण पाच दालने आहेत. यातील बाहेरील दोन बांधीव दालनांच बांधकाम नंतर कधीतरी झाले असावे. आतील दालनातील लेणी प्राचीन असावीत, त्या वरील धार्मिक मूर्त्यांचे व चिन्हांच्या अभ्यासावरून ती लेणी कदाचित, गड बांधणीच्या आधीच्या काळात म्हणजे इसवीसन पूर्व दुसऱ्या शतकाच्या मागे पुढे केव्हातरी खोदली असावीत.
बाहेरील बांधीव दालने नंतरची असून छतावर कमळाचे झुंबर कोरलेले आहे. कोपऱ्यावरील खांबांच्या वरील बाजुस फणा काढलेले नाग कोरले आहेत. ह्या खांबाच्या बांधणी वरून आणि तसेच आतील प्राचीन लेण्यावरुन ह्या वास्तूची बांधणी सुरवातीच्या काळात निश्चीत धान्य कोठारा साठी झाली नसावी. धार्मिक आणि राजकीय उलटा पालटीच्या काळात त्याचे मूळ स्वरूप जाऊन अधे-मध्ये कधीतरी याचे धान्य कोठारात रूपांतर झाले असावे. कदाचित जीवधनला गडाच स्वरूप येण्याच्या कितीतरी वर्ष आधी ह्या लेण्यांच अस्तित्व असावं.
१८१८ मध्ये झालेल्या इंग्रजांबरोबरच्या युध्दात ह्या धान्य कोठारास आग लागली म्हणतात, दहावर्षा पूर्वी गडाला भेट दिली तेव्हा राखेचे अस्तित्व येथे होते. आता या गुंफा बऱ्यापैकी स्वच्छ केल्या आहेत. आतमध्ये संपूर्ण अंधार असल्यामुळे गुंफा न्याहाळण्यासाठी विजेरीची (बॅटरी) गरज लागते. धान्य कोठारा जवळून उत्तर दिशेस दिसणाऱ्या बुरुजाचा बाजूंनी जाणारी वाट जुन्नर दरवाज्यातून घाटघर गावात उतरते परंतु वेळेच्या अभावी या गडभेटीत आम्हाला जुन्नर दरवाजाकडे जाता आले नाही.
धान्य कोठार पाहून झाल्यावर आम्ही पुन्हा गडमाथ्यावर गेलो. गडमाथ्यावर उत्तर बाजूस गडाचे सर्वात उंच टेकाड आहे त्यावरून माळशेज घाट हरिश्चंद्र गड, भैरवगड, घाटघर गावातील धरण आपल्या दृष्टीस पडते. गडमाथ्याच्या पश्चिम दिशेस एक टाक्यांच्या समुह आहे. गड माथ्यावरुन एक वाट टाक्यांचा समूहा जवळून कल्याण दरवाजा कडे जाते. त्या वाटेने आम्ही चालू लागलो आणि आमची गडफेरी संपवून कल्याण दरवाजातून गड उतार होऊन नाणे घाटाच्या दिशेने निघालो.
नाणेघाटाचा इतिहास :
इसवीसन पूर्व २५० ते इसवीसनाच्या नंतर २५० वर्षे येवढ्या पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ काळात सातवाहन घराणे महाराष्ट्रात राज्य करत होते. त्यांची राजधानी होती प्रतिष्ठान म्हणजे आताचे पैठण. पैठण प्रामाणे तेर, नाशिक, जुन्नर ही प्रमुख व्यापारी शहरे होती. त्यांचा व्यापार त्याकाळी ठाणे, कल्याण, चौल, मांदाड इत्यादी बंदरांमधून ग्रीस, रोम, इजिप्त, आफ्रिकेचा पूर्वकिनारा, इराणी व अरबी आखातातील प्रदेश यांच्याशी होत असे.
जुन्नर मार्गे कल्याण बंदरात व्यापार सुलभ व्हावा ह्या साठी घाटघर गावाजवळील एकशेतीस फूट लांबीची प्रस्तर घळ खोदून एक वाट बनवली, हीच ती प्रसिद्ध सर्वात प्राचीन नाणेघाटाची वाट. त्या काळी जुन्नर मार्गे व्यापाऱ्यांचे तांडे चे तांडे बैल, गाढव, घोडे तसचे खेचरांच्या पाठीवर माल लादून कल्याण बंदरी जात. ह्याच महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्गावर सातवाहन राजानी लक्ष ठेवण्यासाठी शिवनेरी, चावंड, हडसर, बहिरव व जीवधन गडांची निर्मिती केली. माळशेज घाटाचा रस्त्याची निर्मिती होई पर्यन्त बावीसशे वर्षे अखंड पणे ह्या घाटाचा रहदारी साठी उपयोग होत होता.
नाणे घाटाच्या नावाची उत्पत्ती मागे दोन आख्यायिका आहेत.
एका आख्यायिकेप्रमाणे घाटाच्या उजव्या बाजूला जो दगडी रांजण आहे त्या रांजणात त्याकाळी मालावरच्या जकातीची नाणी टाकत असत. त्यामुळे या घाटास नाणे घाट संबोधले जाऊ लागले.
दुसऱ्या एका आख्यायिकेप्रमाणे नाणेघाट बांधण्याचे काम काम अभियांत्रिकी क्षेत्रात निपुण असलेल्या नाना व गुणा या दोन तज्ज्ञांकडे देण्यात आले होते. त्यांपैकी जो प्रथम घाट बांधेल त्याचे नाव घाटास द्यावे असे ठरले. दोघांनीही त्यांचे कौशल्य पणाला लावले, घाट बांधणीस सुरुवात झाली. नानाने प्रथम घाट पूर्ण केला म्हणून या घाटाचे नाव नाणेघाट पडले.
नाणे घाटाच्या विस्तीर्ण पठाराला शींगरू पठार म्हणतात. प्राचीन काळी शिंगरू पठारावर व्यापारी वर्गांची पठारावर पालेचे पाले लागत असतील. नाणे घाटाच्या नळीच्या सुरवातीला डाव्या बाजूला दगडी रांजण आहे प्राचीन काळी जकातीची नाणी ह्यात जमा केली जात अशी आख्यायिका आहे.
घाटाच्या डाव्याबाजुला आणि रांजणाच्या समोरच एक गणेश टाक आहे. त्यावर श्री गणेश मूर्ती खोदलेली असून मुर्तीच्या खाली अंतर्गत पाण्याचे टाक आहे.
घाट वाटेने कोकणात उतरण्यास सुरुवात केल्याकेल्या घाटाच्या नळी मध्ये दोन्ही बाजूस सातवाहनकालीन लेण्या कोरलेल्या आहेत. कोकणात उतरताना उजव्या बाजुचे छोट लेणं पाण्याचे टाक आहे.
घाटाच्या नळीच्या डाव्या बाजूची मुख्य लेण सुमारे एकोणतीस फूट असून चौरसाकारचे आहे. लेण्याच्या प्रवेश पायऱ्या जवळ श्री हनुमंताची मूर्ती कोरलेली असून. गुंफेच्या तीन्ही भिंतीवर शिलालेख कोरले आहेत.
डावीकडील भिंतीवर एकूण २० ओळींचा लेख असून मध्य भागातील भिंतीवर १० तर उजवीकडील भागावर दहा ओळी आहेत. हा लेख ब्राम्ही लिपीतला असून, या लेखामध्ये अनेक अंकनिर्दिष्ठ संख्या आहेत. पुराणकालातील इतकी संख्या असलेला हा भारतातील प्राचीन असा लेख आहे. ( इसवी सनपूर्व पहिले शतक). या लेखात सातवाहन सम्राज्ञी ‘नागतिका’ हिने केलेल्या यज्ञांची नावे आहेत. येथे वाजपेय, राजसूय, अश्वमेध अशा प्रकारचे यज्ञ केले असल्याचे उल्लेख सापडतात. या यज्ञात ब्राह्मणांना केलेल्या दानांचा देखील उल्लेख या लेखांमध्ये आढळतो.त्यात सातवाहन राजघराण्याची व धार्मिक स्थितीची माहिती मिळते. लेण्याच्या एका भिंतीवर सातवाहन राजपरिवारातील व्यक्तींची खंडित शिल्पे आढळतात. पण आता ती झिजून गेली आहेत.
डाव्याबाजूच्या गुंफे शेजारील कड्याला बिलगुनच कातळात पाण्याची पाच टाकी खोदलेली आहेत. नाणे घाटाच्या नळीतुन घाट उतरल्यावर हि वाट थेट सह्याद्रीच्या तळाशी वैशाखरे व पुलुसोनाळे ही गावी पोहचते. वैशाखरे गावाची व्युत्पत्ती गझेटियरमध्ये वैश्यगृह (व्यापारी गृह) अशी दिली आहे. प्राचीन काळी व्यापारी वर्ग येथे राहत असावा असा कयास बांधण्यात येतो.
लेण्या पाहून झाल्यावर आम्ही नळीतुन घाट उतरण्यास सुरुवात केली. घाट उतरताना लेण्याच्या पुढेही वाटेत वाटसरूंच्या सोइसाठी दोन्ही बाजूला काही पाण्याच्या टाक्या खोदलेल्या आहेत. पायऱ्याच्या वाटेच्या दुतर्फा उंच पुरातन वृक्षांचे आवरण असल्यामुळे सुर्यदेवाच्या थेट प्रकोपापासून आपला बचाव होतं असला तरी कोकणातीत आद्रते पासून आपण वाचणे तसे कठीणच आहे.
घामाच्या धारांनी निथळत मध्यांनीला आम्ही वाट उतरत होतो. या घाटाचा वळणदार पायऱ्याचा रस्ता संपता संपत नाही घाट चढता आणि उतरतानाही पायऱ्यांचि वाट आपली क्षमता पाहते . या पायऱ्यांची वाट एका छोट्या पठारावर येउन लुप्त होते तिथेच वन खात्याने विश्रांतीसाठी पार बनवला आहे. आम्हीही काही वेळ त्या पारावर विश्रांती घेतली. मधला काही वेळचे विश्रांतीचे तीन चार तास सोडल्यास रात्री पाऊण वाजल्यापासून आम्ही चालत होतो त्यात रात्री झोप नाही भर दुपारी उन्हातुन घाट उतरताना आमचे बरेच सहकारी थकले होते.
छोट्या पठारावरून वाट दाट जंगलातून तीव्र डोंगर धारे वरुन खाली उतरते. डोंगर धारेवरून उतरल्यावर आपल्याला एक ओहोळ लागतो. बऱ्यापैकी वाहते पाणी असल्यामूळे या वाहत्या पाण्यात आम्ही आमची तृष्णा भागवली. घामाने चिखचिख झाल्या अंगाला ओढ्याच्या जलधारानी निर्मळ करून घेतल. आता शरीर मन तरतरीत झाल होत. नेहमी प्रामाणे ओढ्यातुन मन बाहेर पडायला तयार न्हवतं, पण आम्हाला जुन मोठा पल्ला गाठायचा होता त्यामुळे निघणे क्रमप्राप्त होते.
एकुण तीन ओहोळ पार केल्यानंतर एका विस्तीर्ण पठारावरून वाट जाते. पाठीमागे वळून पाहिल्यास संपूर्ण वाटेत नाणे घाटाची ओळख असलेला नानाचा आंगठा लक्ष वेधत राहतो त्यापाठोपाठ जीवनधन आणि त्याचा वांदर लिंगी सुळक्याचे दर्शन होत राहाते. नाणेघाटाच्या नळीचा खडा प्रस्तराचा कोकणा कडील दिसणाऱ्या विशिष्ट आकारा मुळे त्याला नानाचा अंगठा म्हणून ओळखले जाते. हीच त्याची ओळख सर्वदूर आहे.
रात्री पठाराची वाट रमत गमत कधी संपली ती कळली पण नव्हती तीच वाट आता "ही वाट दुर जाते" ह्या चालिवर संपण्याचं नावच घेत नव्हती.
पठाराच्या वाटेत वनखात्याचे दोन मोठाले गेट लागतात. शेवटचा गेट पार करुन आम्ही कल्याण अहमदनगर रस्त्यावर पोहोचलो आणि नाणेघाट-जिवधनच्या भ्रमंतीच्या सुखद आठवणीचा ठेवा घेऊन आमचा परतीचा प्रवास कल्याण मुंबईच्या दिशेने सुरु झाला.
सहभाग -:
१)आर्यन बराटे २)स्नेहल बराटे
३)अरुण बराटे ४)प्रीती कुराडे
५)संतोष गावडे ६)अशित नलावडे
७)संदेश राणे ८)विजय आहुजा
९) शैलेश सावंत
नाणेघाट जीवधन भटकंती पुढील लेखन साहित्याचा उपयोग केला . त्या लेखांच्या लेखकांचे आणि प्रकाशकांचे मनपूर्वक आभार .
नकाशे
नाणेघाट ट्रेकिंग (कल्याण ते प्रतिष्ठान)
नाणेघाट ते जीवधन किल्ला (कल्याण दरवाजा)