वर्षाभटकंती दुर्लक्षित कामणदुर्गाची | भ्रमर



जसजसा पावसाळा जवळ येतो तसे ट्रेकर मंडळीचे पावसाळी भटकंतीचे प्लॅन बनू लागलतात त्यात कित्तेकदा हवशे नवशे गवशे मंडळीचाच भरणा जास्त असतो त्यात ठरावीक गडांवर तर जणू यांची जत्रा भरते.

सहा सात वर्षापूर्वी पालघर ठाणे जिल्हातील पच्छिम द्रुतगती मार्गाजवळील गड या जत्रेपासून अलिप्त होते, पण तेथे ही आता हि गर्दी दिसू लागली. या गर्दी पासून अलिप्त अशी एखादी दुर्ग भ्रमंती करावी विचार करत असताना कामण दुर्ग डोळ्यांसमोर आला.

 मुंबईच्या सर्वात जवळचा कुठला गिरी-वन दुर्ग असेल तो म्हणजे कामण दुर्ग. मुंबईच्या वेशीपासून अवघ्या विस बावीस किलोमीटर अंतरावर असेलेल्या दुर्गाची समुद्र सपाटीपासून उंची अंदाजे २१४०  फुट / ६५२  मीटर असून हा ठाणे पालघर परिसरातील दुसऱ्या क्रमांकाच उंच किल्ला आहे.
चहूबाजूंनी घनदाट जंगलाने वेढलेल्या या दुर्गाला शिव पराक्रमांचि साक्ष नसणे आणि फेसबुक सारख्या समाजमाध्यमामध्ये प्रसिद्धीचे वलय नसणे केवळ याच कारणांमुळे मुंबईच्या इतक्या जवळ असूनही हा गड दुर्लक्षित राहिलेला. इतर प्रसिद्ध आणि वलयांकित दुर्गांची एकंदरीत परिस्थिती बघता एका अर्थाने दुर्लक्षित आहे तेच बरे असे अनेकदा वाटून जाते.

जवळ असूनही आज जाऊ उद्या जाऊ म्हणतं माझी कामण दुर्ग भ्रमंती राहून गेली होती त्यामुळे ह्या वर्षी कामण दुर्गाला भेट द्यायची मनाशी निच्छित केल होते. संतोष, संदेश आणि मी जुलैच्या दुसऱ्या तीसऱ्या आठवड्यात कामण दुर्गला भेट द्यायची ठरवले तो पर्यंत पावसाला बऱ्यापैकी सुरवात होऊन नद्या-नाले वाहू लागतात आणि खऱ्या अर्थाने पर्जन्य ऋतूतील भटकंतीचा आनंद घेता येतो. 

संदेश आपली नॅनो काढायला तयार झाल्यामुळे सकाळी चार-पाचला उठुन बस रेल्वे(लोकल) रिक्क्षा गाठून गडपायथा गाठण्याची कसरत आता टळणार होती. पश्चिम एक्स्प्रेस वे वरून कामण दुर्गाच्या पायथ्याशी वसलेल्या देवकुंडी आदीवासि पाड्यात आम्हाला पोहोचायचे होते. गोरेगाव वरुन स्वाताच्या वाहनाने अवघ्या तीस किलोमीटर असलेल्या देवकुंडी गावात पोहचायला अर्धा- पाऊण तास पुरेसा असल्याने सकाळी साडेसातच्या आसपास घरून निघायाचे ठरले.  एकूण काय पायथ्या पर्यंतचा प्रवास सुखकर होणार होता हे निच्छित.

ठरल्या प्रमाणे आम्ही जुलैच्या १४ तारखेला रविवारि साडेसातच्या सुमारास पच्छिम द्रुतगती मार्गाने कामणदुर्गाच्या दिशेने निघालो. मुंबईची सीमा ओलांडल्यावर घोडबंदरची / वसईची खाडी पार केल्यावर कामण नावाची छोटी खाडी लागते. ज्या कामण गडाच्या नावाने खाडीला नाव आहे त्यावरून त्या गडाचे महत्त्व निच्छित अधोरेखित होते. कामण खाडी पार केल्यावर चार किलोमीटरवरील चिंचोटी फाट्यावर पोहचतो. फाट्यावर उजवीकडे भिवंडी कडून येणाऱ्या चिंचोटी अंजुर फाट्या रोडच्या दिशेने वळल्यावर साधारण साडेतीन किलोमीटरवर अंतरावर डावीकडे कामण गावाची स्वागत कमानी आपल्याला दिसते.
 कामाण गावाच्या स्वागत कमानी कडून गावात प्रवेश करता सिंडिकेट बॅंकच्या जवळुन जाणारा डावीकडील रस्ता दिसतो तोच गाडीरस्ता देवकुंडी गावात जातो. याच रस्त्याने दोन किलोमीटर पुढे गेल्यावर देवकुंडी दोन किलोमीटर लिहिलेला किलोमीटरचा दगड दिसतो. तेथून उजव्या बाजूचा गाडी रास्ता पकडून देवकुंडी पाड्यात पोहोचता येते. कामण गावाच्या स्वागत कमानी पासून देवकुंडी पाडा साधारण चार किलोमीटर आहे. 

येथे सार्वजनिक वहानाने यायचे झाल्यास वसई रेल्वे स्टेशनवर उतरून पूर्वेकडे यावे तेथून शेअर रिक्क्षा पकडून चिंचोटी फाट्यावर उतरावे चिंचोटी वरून कामण गावात जाणाऱ्या रिक्क्षा पकडून देव कुंडीत पोहोचता येते. वसई दिवा लोकलने कामण रोड रेल्वेस्थानकात उतरूही देवकुंडीत येता येते परंतु दिवा-वसई लोकल दिवसातून मोजक्याच फेऱ्या धावत असल्याने तीच्या वेळेप्रमाणे तुम्हाला तुमचा कार्यक्रम आखावा लागतो.  

आम्ही साधारण आठ-सव्वाआठ च्या सुमारास देवकुंडी पाड्यात पोहचलो. झाडाखालील आदिवासी झोपड्या, गुरांचा हंबरण्याचा आवाज, आणि सकाळी जंगलाच्या दिशेने चरायला चाललेल्या शेळ्या. एकंदरीत हे देवाकुंडी पाड्यातील सकाळीच्या वेळेचे वातावरण स्वप्नवत वाटत होत. यात आता आमच्या त्रिकुटाची भर पडली होती. गडाच्या दिशेने चालू लागल्यावर, पाड्याला बिलगुन नागमोडी चंद्रकोरी वळन घेत निसर्गसंगिताच गुंजन करत जंगलातून वाहत येणारी कामण नदी आपली सोबत करत राहते.
कामण नदीच्या शुभ्र धवल नितळ खळखळत वाहणाऱ्या प्रवाहाला बघून एकाद्या हिम नदीचे लघुरूप पाहातो काय असा भास होत होतो .काही वेळ इथेच नदीच्या तीरावर निसर्ग संगीत श्रवण करत ध्यानस्थ बसावे असे वाटते. ही छोटीशी कामण नदी पुढे जाऊन उल्लास नदीच्या मुखाशी म्हणजेच वसाईच्या खाडीशी एकरूप होते.


गावात वाट विचारुन आम्ही मार्गस्थ झालो. गावातून जाणाऱ्या कच्चा रस्त्याने आम्हाला जायला सांगितले. पुढे गेल्यावर रस्त्याला दोन फाटे फुटतात एक कच्चा रस्ता डाव्या बाजूला शेताच्या कुंपणा खेटुन जात होता तर एक फाटा सरळ जंगलात घुसला होता. कामण दुर्ग दोन डोंगराआड लपल्याने दिसत नसल्यामुळे आम्हाला अंदाज आला नाही आणि आम्ही जंगलात घुसणाऱ्या कच्चा रस्त्याने चालू लागलो तो रस्ता जवळच समाप्त होऊन अनेक ढोरवाटा फुटल्या होत्या. थोडा वेळ चाल्यावर संतोषच्या नजरेला आपण चुकीच्या वाटेवर असल्याचे जाणवले. तसेच पाठीफिरून आम्ही शेताच्या कुंपणाच्या बाजूच्या कच्चा रस्त्याने चालू लागलो तेथे शेतात काम करणाऱ्या गावकऱ्या कडून वाटेची खात्री करून घेऊन योग्य वाटेने मार्गस्थ झालो. 
या वाटेवर काही वेळ चाल्यावर वाटेला खेटुन वाहणारा प्रशस्त ओढा दिसला. ओढ्याचा एकंदरीत परिसर पहाता घरून आणलली न्याहारी तिथेच खाण्याचा निर्णय घेतला. ओढ्या काठचा निसर्ग न्याहाळत थोडा वेळ तिथे विश्रांती घेउन झाल्यावर आम्ही पुन्हां मुख्य रस्त्यावर येउन चालू लागलो. त्याच दरम्यान आम्हा तिघांच्या प्रवासत चौथा चारपायाचा सोबती येउन सहभागी झाला होता. मुख्य रस्त्याने काही अंतर चालतातच उजवीकडे पायवाट फुटलेली दिसली त्यावरील बाणाच्या निशाणीच्या दिशादर्शक खुणा आता ठळक दिसत होत्या.   

पुढे पायवाटेने चालू लागल्यावर दोन छोटे ओहळ लागतात ते पार करून आपण डोंगराच्या पायथ्याशी पोहोचतो आणि डोंगररांगच्या उभ्या चढणीतुन जाणारी जंगल वाट सुरु होते. 
ह्या वाटेत मात्र रक्तपिपासू छोट्या मच्छरांचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवतो. जंगलातला दमटपणा आणि अंगावर येणारी उभी चढण यामुळे थकायला होते. त्यात थोडी विश्रांती घेण्यासाठी उभे राहावे तर या उडणाऱ्या वैम्पायरची दहशत त्यामुळे सरळ चालत राहण्या शिवाय पर्याय नव्हता. चुकूनही खास करून पावसाळ्यात जर येथे यायचं असल्यास हाफ शर्ट किंवा शॉर्ट्स असले पर्याय टाळावे नाहीतर भटकंती या डासांच्या त्रासामुळेच खास लक्षात राहील.


डोंगर चढुन गेल्यावर एक छोटे पठार लागते त्या पठारावरील आडव्या वाटेवर जंगलातून येणारी वाट मिळते त्या वाटेवरील खडकावर दिशादर्शक बाणाची खून आहे. अंगावर येणार उभा चढ, त्यात डासांच्या त्रासामुळे बऱ्यापैकी कावलेलं मन पठारावर येताच मात्र पुरतं बदलून गेलं. इथला निसर्ग जणू अचानक बदलला  होता. हवेतला दमटपणा जाऊन आल्हाददायक वातावरण निर्माण झाले होते. काही वेळ इथेच विश्रांती घेउन आम्ही पुन्हा पाय वाटेने चालू लागलो. जसजसे उंचावर जाऊ तसतसे बदलणाऱ्या वातावरणाचा प्रत्यक्ष प्रत्यय येत होता. वाटेत छोट्या बांबूचीवन आणि चवईच्या केळ्यांची (जंगली केळी) झाडे मोठ्या प्रमाणात दिसु लागली. डोंगर कड्यावरून बाजूच्या डोंगरात वाहणाऱ्या धबधब्याचे दर्शन घडत होते वातावरातील ह्या बद्दलामुळे शरीरातील शिण कुठच्या कुठे निघून गेला होता. काही अंतर चाल्यावर आम्ही डोंगरमाथ्यावर येउन पोहोचलो. वर कामणदुर्ग लिहलेला दिशा दर्शक खडक दिसतो. तो पाहून आपल्याला कामाणदुर्गावर पोहचल्याचा आनंद होतो पण तेथुन पुढे कामण दुर्गाच्या दिशेने उतरणारी दरीतील उतरणारी वाट चालू होते.

पायथ्याच्या पासून दोन डोंगराच्या आड कामणदुर्ग असल्या कारणाने आतापर्यंत गडाचे दर्शन झाले नव्हते तसेच ज्याची सकाळ पासून प्रतीक्षा करत होतो ती पर्जन्य देवता ही रुसुन बसली होती. घळीत उतरल्यावर मात्र प्रथमच धुक्याचि दुलइ बाजूला सारून आम्हाला कामण दुर्गाने दर्शन दिले. दोन डोंगर पार केल्यावर आता कुठे दुर्गदर्शन होऊ लागले होते. पाठोपाठ ताबडतोबच मेघराजानी प्रसादरूपी पावसाच्या सरी बरसून खऱ्या अर्थाने आमची पावसाळी भटकंती सफल केली होती. दरीतून रोरावत येणारा वारा आणि सोबत यथेच्छ कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, अप्रतिम टाईमिंग जमून आला होता. समोर मधून मधून काही सेकंदांसाठी धुक्याची चादर विरळ होऊन गडमाथा दर्शन देत होता.  
 
दोन डोंगरांना जोडणाऱ्या या घळीतून आता आपण कामण दुर्गाच्या डोंगरावर गडपायथ्याशी येतो. इथूनच सरळ उभी पायऱ्यांची वाट सुरु होते. काळाच्या ओघात झिजलेल्या पायऱ्याची गड वाट शेवाळामुळे निसरडी होऊन सोप्या श्रेणी कडून अवघड श्रेणी कडे झुकते. ती तितकी सावधपणे पार करायची. काही अंतर पायऱ्या चढून गेल्यावर पायऱ्याच्या बाजूला छोटेशे पाण्याचे कातळात खोदलेले टाके दिसले तेथून धुक्यातुन अंधूकसा दिसणारा गडमाथा आम्हाला खुणवत होता. संपूर्ण परिसर दाट धुक्यामुळे आच्छादित झाल्यामुळे गडमाथा गाठेपर्यंत आजूबाजूच्या तीन चार फुटापलीकडे काही दिसत नव्हते.

गडमाथ्यावर पोहचल्यावर एक पाण्याचे टाक दिसले त्याच्या पुढे एक छोटे पाण्याचे टाक आणि गडाच्या कड्याला बिलगून भग्नावस्थेत बुजलेल्या पाण्याचा टाक्याचे दर्शन झाले. गडाच्या माथ्यावर एक पावसाच्या पाण्या मुळे डोह तयार झाले होते.  त्याखेरिस गडमाथ्यावर तरी बांधकामाचे कोणतेही अवशेष आम्हाला दिसले नाही. गडाच्या पूर्व बाजूच्या पायथ्याशी असलेल्या कुहे गावाचे सात आठ आदिवासी तरूण गडावर खेकडा पार्टी करण्यासाठी आले होते त्यानी डोंगारातले सफेद खेकडे पकडून चुलीत एका छोट्या पातेल्यात रांधत ठेवले होते. कुतूहलापोटी ते बघण्यासाठी गेलो, ना कुठलेही मसाले ना  कुठलीही चटणी वापरता कुठल्यातरी झाडाचा फक्त पाला टाकून खेकडे शिजत ठेवले होते. सहा सात साधारण आकाराचे ते खेकडे  किती जणांच्या वाट्याला येतील याची  शंकाच होती परंतु आनंदाने पार्टी म्हणून ते एंजॉय करत होते. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घेण्याची त्यांची हि मानसिकता मात्र मानला भावली. गडा बद्दल माहिती विचारल्यास मात्र अधिक काही ते सांगू शकले नाही.

गडाच्या पूर्वेस कामण दुर्गा पेक्षा उंचीने जरा थोरला डोंगर दिसतो त्या दिशेने आम्ही दुर्ग पाहण्यासाठी गेलो. तो डोंगर कामण दुर्गाचा भाग असावा दोघांन मध्ये चिंचोळी दरी होती त्या छोट्या डोंगराच्या शिखरावर चढणे पावसामुळे जिकरीचे आहे. पावसाळ्या नंतर बहूतेक त्यावर चढता हि येत असेल, तरी इतर ऋतूत हे चढण्यास कठीण श्रेणीचे शिखर वाटते. दोघांन मधिल चिंचोळ्या खिंडीतून उजव्या बाजूने कुहे गावात वाट उतरते. रेंज ट्रेक करत गुमतारागडा वरुन चालत कुहे गावामार्गे कामण दुर्गावर येतता येते. कुहे गावात येण्यासाठी सार्वजनिक वाहन उपलब्ध नसल्याने सर्व सामान्य गड प्रेमी या वाटेचा उपयोग कमीच करतात. गडाच्या पूर्वेकडील राहाळात राहाणे लोक  मात्र ह्याच खिंडीतूनच कामण दुर्गावर येतात. खिंड पाहून झाल्यावर आम्ही परत माघारी फिरून पच्छिमेकडील गड माथ्यावर आलो. 


कामण दुर्गा बाबत इतिहासात जास्त काही माहिती मिळत नाही कामण दुर्गाला अकराव्या शतकातील महाकावतीच्या बखरीत कामवन नावाने उल्लेखल्या प्रामाणे आजूनही आपल्या नावाला साजेल असा दाटवनाने आच्छादित असून प्राचीन काळी उल्हास नदी मार्गे होणाऱ्या कल्याण-भिवंडी-वसई बंदरावरील व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला असावा.


पोर्तुगीजानी वसई प्रदेश गुजरातच्या सुलताकडून ताब्यात घेतला तेव्हा कामण दुर्ग पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला. इ .स.१६८३ मध्ये संभाजी महाराजांनी वसई चढाईच्या वेळेला कामण दुर्ग जिंकून स्वराज्यात दाखल केला.  इ .स .१६६५ पुन्हां हा गड पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला. पुढे पाण्याआभावी कामण दुर्ग ओस पडला होता. १७३७ मधील चिमाजीआप्पांच्या नेतृत्वाखालील वसई मोहीमेत मराठ्यांनी कामण दुर्ग ताब्यात घेऊन, जुन्या टाक्यांची दुरूस्ती करुन दोन नव्या टाक्या कामण दुर्गावर खोदल्या आणि कामण दुर्ग जागता ठेवला.

कामण दुर्गाच्या पच्छिमेला सिंदुसागराला गळाभेट घेणाऱ्या वसईच्या खाडीचे व वसई नायगाव विरार पर्यंतच्या शहराचे सुंदर दर्शन होते तर दाक्षिणेस उल्हासनदीची खाडी, घोडबंदरच्या परीसरातील उत्तुंग इमारीती आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे जंगल दृष्टीस पडते. उत्तर बाजूस तुंगारेश्वरची हिरवीगार डोंगररांग लक्ष वेधून घेते. आकाश स्वच्छ असेलतर गुमातारा, टकमक, तांदूळ वाडी, कहोज दुर्गही दृष्टीस पडतात.


पावसाळ्यात येथील निसर्ग स्वर्गीय वाटतो. इथला हिरवागार परिसर ढगांचा लपंडाव यातच आपण हरवतो आणि सदेही स्वरग रोहणाचा भास होतो.
पांडवानी श्वना बरोबर स्वर्गारोहण केले. तसा आम्हच्या बरोबर ही कामणदुर्गाच्या स्वर्ग भ्रमंतीस श्वान आला होता. त्याने संपूर्ण दुर्गभ्रमणतीस आम्हाला चांगली साथ दिली. आता ह्या स्वप्निय स्वर्गातून वास्तवात येणे गरजेचे होते त्यामुळे गड उतार होण्याचा निर्णय आम्ही घेतला.

गड उतरते ते वेळी कातळात खोदलेले काही टाके दिसले. गडचढाई करताना धुक्यात लपलेल्या या पाच टाक्यांच्या समूहाचे दर्शन झाले नव्हते, गड उतार होताना मात्र त्यांनी आमचे लक्ष वेधले आणि आम्ही त्यांच्या दिशेने चालु लागलो. ह्या पाच टाक्या जवळ दोन स्त्रिया कोरलेल्या दगडी मूर्ती ठेवलेली आहे हे वाचनास आले होते. पण धुक्यामुळे व वाढलेल्या झाडीमुळे त्या काही पाहता आल्या नाहीत. टाक्या पाहून पुन्हा मुख्य वाटेवर येउन आम्ही गड उतराईला  सुरुवात केली.

सकाळपासून आम्हाला गडमाथा रमत गमत सर करायला साधारण तीन तास पंधरा मिनिटे लागली तर उतरताना मात्र सव्वा दोन तासात आम्ही पायथ्याला पोहोचलो. पायथ्यापासून पुन्हा पायथ्यापर्यंत साधारण साडे सहा तासात आमची हि गडभटकंत झाली होती.   

पुढे देवकुंडी पाड्यात पोहचलो तेव्हा मात्र तेथील परीस्थिती सकाळ पेक्षा पुर्णतः वेगळी होती. कामणनदीच्या बाजूचा संपूर्ण परिसर चारचाकी आणि दुचाकींनी व्यापला होता. कामण नदीचा हा परीसर आणि नदीपात्रही पर्यटकांनी भरून गेल होते सकाळची शांतता जाउन त्याची जागा आता कर्कश गोंगाटाने घेतली होती. हिच परीस्थिती राहिली तर काही वर्षांमध्ये इतर ठिकाणांसारखेच येथे ही येण्यासाठी सरकारी बंधने येतील इतकं मात्र नक्की. बेदरकारपणे पार्क केलेल्या गाड्या जागा मिळेल तिथे बसून चाललेल्या नॉनव्हेज आणि दारूच्या पार्ट्या, हे कमी कि काई म्हणून नदी प्रवाहातही बसून चाललेलं दारूकाम बघून कधी एकदा इथून निघतो असं मात्र झालं. निसर्गाने मुक्त हस्ताने दिलेलं दान त्याच आदरानं उपभोगण्या ऐवजी असा थिल्लरपणा करणारी हि आपली लोक कधी सुजाण पर्यटक होणार काही कळत नाही. अशाच बेशिस्त आणि तळीराम लोकांमुळे मुबंई-पुण्या जवळील अनेक निसर्गसुंदर धबधबे आणि पावसाळी भटकंतीची ठिकाणे शासनाला बंद करावी लागतात ज्याचा त्रास खऱ्या निसर्ग प्रेमिना होतो. 

हा एवढा भाग सोडल्यास आमची कामणदुर्ग भटकंती एकूणच छान झाली होती. आज पहिल्यांदाच आम्ही एखादी गडभटकंती करून अंधारपडायच्या आधी घरी पोहोचलो होतो. पण या निसर्गभेटीने मनाला झालेलं रिफ्रेशमेंट मात्र अजिबात कमी नव्हतं. आता पुढल्या एखाद्या भटकंतीपर्यंत हे पुरवून पुरवून वापरावं लागणार इतकं मात्र नक्की.


संदर्भ:
डिजिटल -

पुस्तके -
डोंगरयात्रा -: लेखक - आनंद पाळंदे

सहाय्यक:
लिखाण - संतोष गावडे.
तंत्रनिर्देशक - संदेश राणे.