भटकंती माळशेजघाट आणि परिसराची | Wanderings of Malshejghat and surroundings | भ्रमर






लॉक डाऊन संपून हळूहळू सर्व पुर्वपदावर होत असल्याचा फायदा घेऊन मुंबई जवळील निसर्गाच्या सान्निध्यातील एखादी प्राचीन घाट वाट किंवा छोट्याश्या गडाची भटकंती करून रिफ्रेश व्हावंसं वाटत होतं.

त्यासाठी निश्चित जागा ठरत नव्हती. शनिवारी सकाळी सुरु झालेला अहुपेघाट किंवा सोंडाई किल्ल्याच्या भटकंतीचा प्लॅन संध्याकाळपर्यंत माळशेज घाटाच्या भटकंतीवर येउन ठेपला. बरेच दिवस चालण्याचा सराव नसणे आणि ऑक्टोबर हीट हे प्लॅन बदलण्याचे मुळ करण होते . 

 नेहमी प्रमाणे रात्रीपर्यंत भटकंतीला येणाऱ्या भिडुंची गळती होऊन आता रवी, संदेश आणि मी असे फक्त तीघेच उरलो होतो. रविवारी सकाळी साडेपाच्या सुमारास आमचं तिघांचं त्रिकूट गोरेगावहून  कल्याण - नगर रोडने माळशेजच्या दिशेने निघाले.

माळशेज घाट परिसर बाराही महिने पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. खास करून पावसाळ्यात मात्र घाटाचा नजारा काही औरच असतो.

कल्याण - नगर रस्त्यावरील महत्वाचं ठिकाण म्हणजे मुरबाड हे तालुक्याचे गाव. माळशेज घाटाच्या चढाईची सुरुवात ह्याच तालुक्यातून होते. 

भीमाशंकर पासून आजोबापर्वता पर्यंतच्या डोंगररांगेतील गडकिल्ले, घाटवाटा, प्राचीन मंदिरे, तसेच पर्यटनस्थळांच्या भटकंतीसाठी येथील बस डेपो आणि रिक्षा स्टॅन्ड मधून लालपरी आणि वडापरिक्षा मिळण्याचे हमखास ठिकाण. 

मुरबाडपासून रस्तावरील शहरवस्त्यांची दाटी कमी होते आणि दुतर्फा झाडांची दाटी सुरू होऊन निसर्गाच्या सान्निध्याने प्रवास सुरू होतो.
  
मुरबाडपासून माळशेजच्या दिशेने जाताना उजवीकडे समांतर अशा सह्यरांगेतील भीमाशंकर सिध्दगड, गोरखगड, दुर्ग, ढाक, जीवधन, नानाचा आंगठा, मोरोशीचा भैरवगड सारख्या शिखर सुळक्यांचे दर्शन होते. आज सकाळी मात्र बऱ्यापैकी ढगाळ वातावरण असल्याने भीमाशंकर ढाक पर्यंतची गिरीशिखरे ढगाआड लपली होती.

मुरबाडनंतर सरळगाव आणि टोकवडे ही पंधरा-वीस किलोमीटरचे अंतर राखून असलेली रस्त्यावरील महत्वाची गावे. टोकवडे सोडताच माळशेज घाटाची चाहूल लागते आणि दुतर्फा झाडाची दाटी वाढून रस्ता नागमोडी वळणे घेण्यास सुरुवात करतो.
वैशाखरे गावजवळ येताच नानाचा आंगठा आणि जीवधनगड आपले लक्ष वेधून घेतात. नाणेघातील वैशाखरे हे गाव नाणे घाटा इतकेच प्राचीन ! गावाची व्युत्पत्ती गझेटियरमध्ये वैश्यगृह (व्यापारी गृह) अशी दिली आहे. प्राचीनकाळी व्यापारी वर्ग येथे राहत असावा असा कयास बांधण्यात येतो.

वैशाखरे गावाच्या पुढे दोन किलोमीटर उजवीकडे नाणेघाटाचा नामफलक आहे. प्राचीन नाणेघाटाची सुरुवात होते तिथे वन खात्याने स्वागतकमान लावलेली आहे. कमानी जवळून नाण्याच्या आंगठ्याचं आणि जीवधन किल्ल्याचं सुरेख दर्शन होते. नेहमीच्या शिकस्त्याप्रमाणे स्वागत कमानी जवळ भेट देऊन आम्ही माळशेजच्या दिशेने निघालो.

वैशाखरेच्या पुढे गेल्यावर मुख्य रांगेपासून वेगळी झालेली उभी कातळ सुळक्याची भिंत आपले लक्ष वेधत राहते. निसर्गाचे हे कातळशिल्प प्रत्यक्ष मोरोशिचा भैरवगड आहे. ह्या टेहळणीगडाचा माथा छोटा असला तरी भैरवगडाच्या भटकंतीचा थरारक अनुभव घेण्याची प्रत्येक भटाक्याची ईच्छा असते.
निष्णात गिर्यारोहकाच्या मार्गदर्शनाखालीच ह्या गडाचामाथा सर करता येतो.

वळणदार रस्त्यावरुन आपण मोरोशीच्या पठारावर पोहचतो ह्या पठाराव थोडा वेळकाढून थांबावे आणि दूरपर्यंत होणाऱ्या बेलाग सह्यरांगेचा नजारा न्याहाळून नंतरच पुढे जावे.

पठारावरून दक्षिणेस भैरवगडापासून उत्तरेस दृष्टी फिरवल्यास अनुक्रमे माळशेज, हरिश्चंद्र, आजोबा, अलंग-मदन-कुलंग पर्यंतच्या सह्यरांगेचे दर्शन घडून येते. सह्याद्रीची सरासरी जास्त उंच असलेली सह्यशिखरे येथून पाहाता येतात. हजार-दोन हजार फूट सरळ कोकणात उतरणारे कातळकडे ह्या रांगेचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. भीमाशंकर ते सांदनवॅलीपर्यंचा प्रत्येक कोकणकडा निसर्गसौंदर्याच्या बाबतीत आपले वेगळे वैशिष्ट्य जपत असून हरिश्चंद्राचा कोकणकडा ह्यारांगेतील मुकुटमणी शोभावा असा आहे.

पठाराच्या जागेवरून सह्यभटकंतीतील स्वर्ग समजल्याजाणाऱ्या गिरीस्थळांच दूर-दर्शन घेऊन आम्ही माळशेजच्या दिशेने निघालो. माळशेजच्या पायथ्याशी सावरणे  गाव आहे. त्या गावातून थिदबी गावाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याने काळू धबधब्याच्या पायथ्याशी जाता येते. कोकणातील ठाणे जिल्हातील ह्या सवर्णे गावातून माळशेजघाटाच्या चढाईला सुरुवात होऊन पुणे जिल्ह्यातील खुबी गावातील पठारावर चढाईची समाप्ती होते.

सावरणे गावानंतर माळशेज घाटातील आंगावर येणारे वळणावळणाचे तीव्रचढ सुरू होतात. पावसाळ्यात घाटाच्या पायथ्यापासून माथ्यापर्यंत असंख्य धबधब्याचे प्रवाह ओथंबून वाहात असतात. त्यातील काही प्रवाह तर थेट रस्त्याच्या मधोमध झेप घेतात. मुसळधार पावसात दरडी कोसळण्याचे प्रमाण येथे जास्त असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने पावसाळ्यात काही वेळा घाट बंद ठेवण्यात येतो.

घाटाचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सोईसाठी शासनाने घाटात विविध ठिकाणी पार्किंग आणि फोटोग्राफीसाठी पॉईंट बनवले आहेत. पॉईंटवरुन घाटातील दिसाणारे निसर्गसौंदर्य न्याहाळण्याचा मोह आवरता येत नाही. आमची ही या स्थळांना भेट देत घाटाची चढाई सुरू होती. 

घाटाच्या एका वळणावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावण झालेली खिंड आसा बोर्ड आपले लक्ष वेधून घेतो. बोर्डच्या वरच्या दिशेने तळेरानच्या वसईवाडीतून किल्ले निमगिरीकडे एक जुनी वाट जाते. ह्याच खिंडीतून वर जाणाऱ्या वाटेतून शिवाजी महाराजांनी सुरतेतील दुसऱ्या लुटीतील मौल्यवान हिरे आणि माणिक मोती स्वराज्यात घेऊन आले. शत्रूची चाहूल लागताच कुकडी नदीच्या पात्रातील डोहात हिरे माणके लपून ठेवली होती अशी माहिती सांगितली जाते.

घाटाच्या माथ्यावर कातळ कड्याला बिलगून छोटेसे शिवमंदिर आहे. अशी मंदिरे बहुतेक सर्व घाटात आपल्यास घाटरक्षक देवता म्हणून दिसतात. मंदिरा शेजारी पावसात थेट रस्त्याच्या मधोमध कड्यावरू कोसळणार्‍या धबधब्यांचा आनंद घेता येतो. मंदिराशेजारी माळशेजचा सुप्रसिद्ध बोगदा आहे.

घाटातील बोगदा पार केल्यावर आपण थमपॉईंट जवळ पोहोचतो.

थमपॉईंटवरुन समोर हरिश्चंद्रगडाची आकाशाला गवसणी घालणारी शिखरे आणि खाली खोलवर पातळाचा ठाव घेणाऱ्या कोकणातील काळू नदीचे खोरे, सभोवती सय्यरांगेतून कोसळणाऱ्या असंख्य जलधारा असा अप्रतिम निसर्गपट मांडलेला दृष्टीस पडतो .

थमपॉईंटच्या समोरील कड्यावर एम टी डी सी चे गेस्ट हाउस आहे. गेस्ट हाऊसच्या स्वागत कमानी जवळून एक पाय वाट दरीत उतरते. ही वाट थोडी शोधावी लागते. दरीच्या टोकाजवळ जाईपर्यंत वाट सहसा दिसत नाही .

दरीच्या टोकाजवळ गेल्यावर गर्द झाडीतून दरीत उतरणारी बांधीव पायऱ्याची वाट दिसते. हिच ती जुन्या माळशेज घाटनावाने सुप्रसिद्ध असलेली प्राचीन वाट. वाट जिथे कड्याला खेटून जाते तिथे कातळात पायऱ्या खोदल्या आहेत. पुढे ही वाट कोकणातील थितबी ह्या आदिवासी गावत उतरते .

घाटवाटेतील दरींतून वाहाणारऱ्या जलप्रवाहाने निर्माण झालेले धबधबे प्रवास स्वप्नवत करतात. घाटवाट उतरण्यास सुरुवात केल्यावर काही अंतरावर कड्यावरील कपारीत गणपतीची मूर्ती कोरली आहे. 

मूर्तीच्या माथ्याजवळील बाजूस चंद्र - सूर्य ही शुभ चिन्हे अंकित केलेली आहेत. घाटवाटेच्या प्राचीनतेची साक्ष देणाऱ्या कातळात खोदलेल्या पाण्याच्या टाक्या आहेत. येथून काही अंतरावर असलेल्या नागेश्वरमंदिराच्या शेजारी सातवाहनकाळाची साक्षीदार आसणारी गुंफा कातळात खोदलेली आपणस आढळते. ह्या घाटवाटे जवळील सगळ्या गोष्टींचा संबंध सातवाहन काळाशी जोडता येतो. कोकणात उतरणाऱ्या अनेक सातवाहन कालीन व्यापारी मार्गावर पाण्याच्या टाक्या आणि गुंफा खोदलेल्या आहेत .

बहुतेक ही घाटवाट जुन्नर ते कल्याण व्यापारासाठी सातवाहन काळात नाणेघाटाच्या निर्मिती नंतर बांधली असावी. नाणे घाटाला आपण द्विपदरी महामार्ग म्हणू शकतो. कारण नाणेघाटाची खिंड प्रशस्त असून एकावेळी दोन मालवाहतूक करणारी गाढवे, खेचर आरामत ये - जा करू शकतात. हा घाट एकपद्रि म्हणावा असा आहे  ह्या घाटवाटेतून एकावेळी एकच मालवाहतूक करणारे गाढव किंवा खेचर कसेतरी प्रवस करु शकेल.


   ह्या घाटवटेची ऐतिहासिक माहिती देणारा फलक घाटाच्या सुरूवातीला लावला पाहिजे. त्यामुळे ह्या घाटाची एतिहासिक माहिती सर्वसामान्य लोकांन पर्यंत पोहचेल.  
       
अशा प्राचीन ऐतिहासिक घाटाच्या दर्शनाने माळशेज भ्रमंती करावी. वेळ असल्यास जुन्या घाटातून कोकणात थितबी गावात उतरून सावरणे गावातून महामार्गांवर यावे, किंवा घाटातील गणेशाचे दर्शन घेऊन आल्यावाटे परत फिरून उर्वरित माळशेज जवळील परिसराची भ्रमंती करावी.

आम्ही गणेश मूर्ती जवळून परत वर आलो आणि एम टी डी सी जवळील कोकण कड्यास भेट देण्यास गेलो. कोकण कड्यावरून दूरपर्यंत कोकाणतील सौंदर्याचा थाट मांडलेला दिसतो, त्याच बरोबर संपूर्ण माळशेजचा घाट रस्ता न्याहाळता येतो.
 घाटातील वळणा-वळणाच्या रस्त्यावरून लहान मुलांच्या खेळण्यातील गाड्यांप्रमाणे भासणाऱ्या गाड्यांची ये-जा करतानाचा प्रवास, पाहताना वेगळीच मज्जा येते.

पावसात ढगांशी लपंडाव करणारी गिरीशिखरे, कड्यावरून झेप घेणारे धबधबे, कोकणकड्यावर दूरपर्यंत पसरलेली हिरवळ ही डोळ्याचे पारणे फेडणारी मनोहारी दृश्येपाहून येणारे पर्यटक माळशेजला स्वित्झर्लंडची उपमा देतात. कोकणकड्यावरून सूर्यास्ताच्या वेळी क्षितिजावर विखुरलेल्या रंगछटा आणि त्यामध्ये नहालेली सह्यशिखरे पाहण्याचा आनंद वेगळाच असतो. 

इतर सह्याद्रीतील कोकणकड्याप्रमाणे येथेही वाऱ्या-पाण्याच्या खेळामुळे तयार झालेला रिव्हर्स वॉटरफॉल आपण पाहू शकतो. 
काही वर्षांपूर्वी येथील कोकणकड्याच्या पठारावर सोनकी सारखी अनेक रानफुले फुललेली पाहायला मिळत, आता फक्त ती रेलींगच्या पलीकडे कड्यावरच दिसून येतात. पठारावरील वाढत्या पर्यटनामुळे रानफुलांवर झालेला हा दुष्परिणामच. 
          
एम टी डि सि ने संपूर्ण कोकणकड्याभोवती सुरक्षेसाठी रेलिंग लावले आहेत. पर्यटकांना फिरण्यासाठी बांधीव पेबरब्लॉकची पायवाटा बांधून जागोजागी विश्रांतीसाठी बाकांची सोय केलेली दिसून येते.
     
एम टी डी सी ने पर्यटकांना राहण्यासाठी गेस्ट हाऊस बांधले असून तिथे जेवण आणि राहण्याची उत्तम सोय आहे. खिरेश्वर गावातही घरगुती सोय उपलब्ध होऊ शकते. एकूणच हा एक - दोन दिवसीय सहपरिवार पर्यटनासाठीचा उत्तम परिसर आहे. 

आम्ही कोकणकडा पाहून झाल्यावर खुबी फाट्याच्या दिशेने निघालो. खुबी फाट्याजवळील बस स्टॉपच्या आधी एक पायवाट काळू धबधब्याच्या कड्यावर जाते. 
त्या कड्यावरुन थेट १२०० फुट कोकणात झेप घेणारा काळूधबधबा पाहाता येतो. काळूधबधब्याच्या १२०० फुट जलधारे मधून काही संस्था वॉटर रॅपलिंग सारखे साहसी उपक्रम आयोजित करतात.

खुबी फाट्याच्या पुढे पिंपळगाव - जोग धरण आणि त्याची भिंत दिसते. पिंपळगाव जोगधरणाच्या भिंतीवर आता खिरेश्वर गावात जाणारा पक्का डांबरी रस्ता झाला आहे. त्यामुळे आता खिरेश्वरगावात सर्व प्रकारच्या गाड्या सहज पणे ये-जा करू शकतात. खिरेश्वर गावातून भटक्यांचा स्वर्ग समजल्या जाणाऱ्या हरिश्चंद्रगडावर तोलारखिंडी मार्गे जाणारी पायवाट जाते.

हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणात व मत्स्यपुराणात आढळत असल्याने त्याला पुराणपुरुष ही उपमा दिली जाते . गडाच्यामाथ्यावर शिलाहार वंशाच्या झंज राजाने बांधलेले "हरिश्चंद्रेश्वर" हे सुंदर मंदिर आहे. मंदिरा शेजारी काही गुंफाही कोरलेल्या आहेत. मंदिराबरोबरच पुष्करणी, गणेश गुंफा या गडावरील प्रमुख वास्तु आहेत. या गडावरील मुख्य आकर्षण म्हणजे  येथील कोकणकडा. संत ज्ञानेश्वर कालीन चांगदेव महाराजांचे वास्तव्य ह्या गडावर होते असे मानले जाते. 

खिरेश्वर गावातही एक प्राचीन मंदिर शिल्प आहे. झंज राजाने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थळी मंदिरे बांधली त्यापैकी खिरेश्वर गावात पुष्पावती आणि काळू नदीच्या उगमस्थळी नागेश्वर हे मंदिरे बांधले. 

नागेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी धरणाच्या बांधावरून डावीकडे एक कच्चा रस्ता काळूनदीच्या छोट्या पात्राच्या दिशेने जातो. त्याच रस्त्यावरुन उजवीकडे नदीच्या पात्राजवळ मंदिराहूनही प्राचीन असलेल्या कातळात खोदलेल्या गुंफेकडे जाता येते.
सातवाहन काळात व्यापारी मार्गाजवळ गुंफा बांधण्यात आल्या त्यापैकी ही एक असावी.


 खांबांवर कोरलेल्या घुमटाकार आकारा मुळे स्थानिक लोक त्यास पूर्वी राजवाडा समजत होते.
 म्हणून गुंफेला "राजवाडा" म्हणून ओळखले जाते.
 बहुतेक ही गुंफा बुद्धीज सन्यासी लोकांना राहाण्यासाठी बांधली असावी. बुद्धीज गुंफेमध्ये स्तूप असतात तसे इथे ते दिसत नाही. समोरील बाजूस ज्या काही वास्तू कोरल्या आहेत त्याचा उलगडा काही होत नाही. कारण ते स्तूप दिसत नाहीत. जर ह्या वास्तू कोरल्या गेल्या तर स्तूप कोरले गेले पाहिजे होते. 
गुंफेच्या समोरील बाजूस पडझड झाल्यामुळे पावसाळ्यात गुंफेमध्ये बऱ्यापैकी पाणी भरते.
 पावसाळ्यात सभोवती गर्द झाडी असते आणि गुंफा पठारावर कोरली असल्याने मंदिरा शेजारी गुंफा असूनही सहसा दृष्टीस पडत नसल्याने मोजकेच पर्यटक गुंफेला भेट देतात. 
दुर्लक्षित अशा प्राचीन वारस्याची भेट घेऊन नागेश्वराचे दर्शन घेण्यासाठी पुन्हा कच्च्या रस्त्यावर यावे.


एकेकाळी तीर्थक्षेत्र असलेले हे  मंदिर आता मात्र उपेक्षित अवस्थेत दिसून येते. आता मंदिरापर्यंत कच्चा गाडी रस्ता झाल्यामुळे बरेच पर्यटक गाडी घेऊन दर्शनास येतात. काही वर्षापूर्वी मंदिर पाहाण्यासाठी रस्ता शोधत यावे लागत असे. स्थानिक नागरिक किंवा हरिश्चंद्रगडाला भेट देणारे ट्रेकर मंदिरास आवर्जून भेट देत असत.

पावसाळ्यात काळूनदीचा छोटा प्रवाह पार केल्यावर आपल्याला मंदिर दिसू लागते. मंदिरासमोर गणेशाची आणि नंदीची मूर्ती विजरामान असून मंदिर पूर्व मुख आहे. मंदिरात प्रवेश करताच गर्भगृहातील दरवाजाच्या चौकटीवर शेषशाही विष्णूची मूर्ती कोरली आहे. तब्बल पाच फूट लांबीच्या शेषावर विराजमान झालेला विष्णू आणि त्याचे पाय चुरणारी लक्ष्मीचे असे एक उत्तम शिल्प पाहायला मिळते. छताला आणखी विविध देवतांची सोळा शिल्पे कोरलेली आहेत.

या भूमीजशैलीतील मंदिरावरील छतावर कोरलेल्या मुर्त्यापाहून रतनवाडीतील अमृतेश्वर मंदिर आणि संगमेश्वरमधील कर्णेश्वरमंदिराची आठवण झाली. त्या मंदिरांच्या छतांवरही अशीच देव-देवतांची शिल्पे कोरली आहेत. ती मंदिरे थोडी भव्य असून त्यामानाने हे मंदिर छोटे आहे.

मंदिराच्या शिखरावरी काही शिल्पे भग्नावस्थेत पाहायला मिळतात. हे शिल्पवैभव पाहून मंदिराची त्याकाळील सौंदर्यश्रीमंती कशी असेल ह्याचा अंदाज बांधता येतो.  मंदिराच्या बाजूला काही शिवलिंगे आणि वीरगळ ठेवलेले आहेत.

असा हा समृद्ध प्राचीन वारसा एका अडगळीत पडलेला पाहून थोडे निराश व्हायला होते. 
श्री नागेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही पिंपळगाव - जोग धरणाच्या दिशेने निघालो. पुष्पावती नदीवर बांधलेले हे जोग धरण माळशेज परिसराच्या सौंदर्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते. त्याच्या सौंदर्याची भुरळ फ्लेमिंगो सारख्या परदेशी पाहुण्यांनाही पडली असून थंडीच्या मोसमात फ्लेमिंगो सारखे स्थलांतरित पक्षी या धरणात वास्तव्यासाठी येतात. 

धरणाजवळ काही बोटिंग क्लब असून नौकानयनाचा आनंद घेता येतो. धरणाच्या सभोवती कॅम्पिंग साइट आणि काही रिसॉर्ट ही पाहायला मिळतात. धरणाच्या दक्षिणेस सिंधोळा नावाचा टेहळणी किल्ला आहे. खुबीफाट्याच्या आणि वेळखिंडीच्या मध्ये करंजाळे गाव आहे. गावात "करंजाळेगाव" नावाची पाटी दिसते. पाटीच्यापुढे टपरीवजा हॉटेल आहे. करंजाळेगावच्य नावाच्या पटीसमोर एक प्रशस्त पायवाट खिंडीच्या दिशेने जाते. त्या वाटेने खिंडीत पोचल्यावर उजव्या बाजूने डोंगराच्या सोंडेवरून सिंधोळागडावर जाता येते. गडावर जास्त अवशेष नसून गडमाथा लहान आहे. गडाचा उपयोग माळशेज घाटातील व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असावा.

माळशेजघाटाच्या माथ्यारील सिंधोळ्यागडाच्या भटकंतीस सर्वसाधारण तीन तास लागतात. माळशेजच्या भ्रमंतीच्या वेळी सिंधोळ्यागडाला भेट देता येते. सिंदोळ्यागडाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होणे गरजेचे आहे. त्यामुळे गडाच्यारुपाने माळशेज परिसराच्या भटकंतीस आणखी एक मानाचा तुरा खोवला जाईल.

माळशेजपासून अवघ्या तीस किलमीटरवर असलेल्या शिवजन्मभूमी शिवनेरी तसेच अष्टविनायकातील लेण्याद्री आणि ओझरसारख्या स्थळानाही भेट देता येऊ शकते.

माळशेजचा परिसर हा खऱ्याअर्थाने पर्यटनासाठी परिपूर्ण ठिकाण म्हणतात येईल. 
काय नाही या परिसरात? 

चोहोबाजूने नैसर्गिक सौंदर्याची उधळण आहे, त्याचबरोबर सातवाहनकालीन जुना माळशेज घाट आणि शिवाजी महाराजांच्या पदस्पर्श लाभलेली खिंडीची ऐतिहासीक वाट.

पद्मावती आणि काळू नदीचे उगमस्थानी नागेश्वराचे मंदिररुपी तीर्थक्षेत्र आणि त्याच्या बाजूला काळू नदीच्याकाठी एक पुरातन गुंफा.

तीनहीबाजुला सह्य शिखरांचा वेढा तर पश्चिमेस कोकणाच्या दिशेने काळजाचा ठोका चुकवणारे काळूबाईचे खोल खोरे, तर पठारावर विस्तीर्ण पसरलेले पिंपळगाव जोग धरणाचे जलाशय.

ह्या परिसराचे रक्षक बनून आकाशाचा ठाव घेणारा पुराणपुरुष हरिश्चंद्रगड तर एका बाजूला छोटासा सिंदोळागड ठामपणे उभे आहेत. 

एक निसर्गप्रेमी भटक्याला भटकंतीसाठी याहून दुसरं आणखी काय हवं!

सहभाग -
रवी सावंत
संदेश राणे
शैलेश सावंत

माळशेजघाट आणि परिसर